सविंदणे – सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतक-याच्या उसाच्या शेतामध्ये ७-८ दिवसांपासून बिबट्या व पिल्ले असल्याचे उसतोडणी करताना निदर्शनास आले होते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली होती, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन फटाके वाजवा तो निघून जाईल अशा पद्धतीचा सल्ला दिला. त्यानंतर दोन-तीन दिवस शेतकऱ्यांनी अशी कृती केली. त्यानंतर कारखाना दोन दिवसानंतर बंद होणार असल्याने, पुन्हा ८ दिवसांनी रविवार दि. १९ रोजी ऊस तोडण्यासाठी मजूर आले असता उसाच्या शेतामध्ये असलेल्या बिबट्याने ऊसतोडणी मजुरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बचाव करून पळत असताना ऊसतोडणी मजूर महिलेच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला जखम झाली आहे.
यामध्ये महिलेचा थोडक्यात डोळा बचावला आहे. याबाबत सागर रोकडे यांनी शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना फोनवरून माहिती दिली असता, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या वतीने वन कर्मचारी हनुमंत कारकुड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पिंजरा लावला आहे. सविंदणे येथे बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेकदा पशूधनांवर हल्ले झाले आहे. यामुळे वनविभागाच्या वतीने तात्काळ उपाययोजना राबवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
ऊसाच्या शेतामध्ये बिबट्या व पिल्ले असल्याची माहिती ८ दिवसांपूर्वी वनविभागाला दिली होती. कारखाना बंद होण्यासाठी २ दिवसच बाकी आहे. बिबट्याने हल्ला केल्याने ऊसतोडणी मजूर घाबरले असून, ऊसतोडण्यास तयार नाही. कारखान्याने ऊस न नेल्यास राहिलेल्या ऊसाची नुकसान भरपाई वनविभागाला द्यावी लागेल.”
पंढरीनाथ धोंडीबा लंघे