पुणे – लोहगाव परिसरात गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या नितीन किसन सकट (वय 21,रा. खेसेपार्क, लोहगाव) याची मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हेगारी व विध्वंसक प्रतिबंधक कायद्याने (एमपीडीए) करण्यात आलेल्या स्थानबध्दतेच्या कारवाईतून मुक्तता केली आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिला. पोलिसांनी मोक्काच्या खुप कारवाया केल्या आहेत. त्या न्यायालयात टिकत नसून, आरोपींना जामीन मिळत आहेत. त्यानंतर स्थानबध्देच्या कारवाई करण्यात येत आहेत. त्याही टिकत नसल्याने पोलिसांना झटका मानला जात आहे. उच्च न्यायालयात सकट याच्या वतीने ऍड. पुष्कर दुर्गे आणि ऍड. सुयश खोसे यांनी बाजू मांडली.
दारूच्या नशेत पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून दशहत निर्माण केल्याचा गुन्हा सकट व त्याच्या साथीदारांविरूध्द नोव्हेंबर 2022 दाखल आहे. पोलिसांनी त्याला 15 मे 2023 रोजी कारवाई करून अमरावती कारागृहात स्थानबध्द केले होते. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयत धाव घेतली होती. न्यायालयात पोलिसांच्या साक्ष विसंगत असल्याचे बचाव पक्षातर्फे ऍड. दुर्गे आणि ऍड. खोशे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.