मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने लैंगिक छळ प्रकरणात तांत्रिकाविरुद्ध निकाल देताना म्हटले आहे की, लोक त्यांच्या समस्या घेऊन तांत्रिक आणि बाबांकडे जातात. हे आपल्या काळातील दुर्दैवी वास्तव आहे. तांत्रिक उपायांच्या नावाखाली लोकांचे शोषण करतात.
हे तथाकथित तांत्रिक आणि बाबा लोकांच्या दुर्बलतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेतात. हे (तांत्रिक/बाबा) समस्या सोडवण्याच्या नादात लोकांकडून पैसे उकळतातच, पण कधीकधी पीडितेचा लैंगिक छळही करतात, अशी महत्वपूर्ण टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.
सहा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना मुंबई उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
४५ वर्षीय व्यक्तीने आपण तांत्रिक असल्याचा दावा केला होता. उपचाराच्या नावाखाली तो मतिमंद मुलींचे लैंगिक शोषण करत असे. तसेच अल्पवयीन मुलांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांच्या पालकांकडून १.३० कोटी रुपये घेतले होते.
२०१० मध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने २०१६ मध्ये तांत्रिकाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाला तांत्रिकाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि शिक्षा कायम ठेवली.