ह्युस्टन – अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एका चर्चवर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी दोनच्या सुमाराला वेस्ट फ्री वे चर्चवर हा हल्ला झाला. या हल्ल्याला सुरक्षा जवानांनीही त्वरीत प्रत्युत्तर दिले. त्यात एकूण तीन जण टिपले गेले आहेत. त्यात गोळीबार करणाऱ्या इसमाचाहीं समावेश आहे असे सांगण्यात येते. या प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अबोट्ट यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हे सैतानाचे हिंसाचारी कृत्य आहे असे त्यांनी म्हटले आहे.
प्रार्थनेचे स्थळ हे पवित्र स्थळ मानले जाते. पण तिथेही या सैतानांची दुष्ट नजर गेली आहे. हल्लेखोर नेमके कोण होते याची माहिती अजून जाहीर झालेली नाही.सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात जे तीन जण टिपले गेले आहेत ते ठार झाले की जखमी आहेत ही माहितीही मिळू शकलेली नाही. दोन वर्षांपुर्वी याच परिसरात एका चर्चवर केलेल्या गोळीबारात 26 जण ठार झाले होते.