अॅटॅचमेंट

“जगभर पसरलाय “हा’ रोग नाही का?’ सीमा हसतच बिनाला म्हणाली. बिनाचे लक्ष कुठं होतं; तिचं तिलाही ठाऊक नव्हतं, इतकी ती हातातल्या मोबाईलवर काहीतरी वाचून-बघून स्तब्ध झालेली सीमाला दिसली. म्हणून मोबाईलचे वेड अती झाल्याबाबतचा तो टोमणा तिने मारला होता.

आत येतयेत सीमाने पर्स टेबलवर ठेवली आणि बिनाच्या हातातील मोबाईल हिसकावून तो सोफ्यावर ठेवला. बिना अस्वस्थपणे म्हणालीही, “अगं! सीमा दे ना प्लीज तो इकडे!’ “नो. मॅडम! फक्त गप्पा आणि गप्पा… दुसरे काही नथिंग! हे बघ! मी काय घेतलं येताना तुझ्यासाठी मस्त; आवडलं आणि तुला शोभून दिसेल म्हणून घेतली ही इअरिंग्ज! मस्त ना!’ पर्स उघडून ती तिच्या कानात घालताना सीमाला तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपायला वेळ लागला नाही. “ए फुगीर! बोल ना कुठे अडकली आहे गाडी तुमची की, पंक्‍चर झालीय आज? की मोबाईल असा दूर गेला म्हणून बाईसाहेब रुसल्या?’

तशी बिनाने तिच्या येण्याआधी आलेला मेसेज आणि फोटो दाखवून तिला तिच्या नाराजीचे कारण सांगितलं. काहीच वर्षांपूर्वी अशा अनेक आणि व्हाट्‌सअप ग्रुपवर तसे बिना, सीमा असायच्या आहेत. पण सीमा तिच्या ऑफिस संसार आणि इतर कामात फारसे नसायची. तेवढीच बिना व्यस्त असूनही सर्वांशी गप्पा मारत संपर्कात राहायची. मेसेज देवाणघेवाण आणि अशा एकूण हसत-खेळत ग्रुपवर वावर असल्याने तिची बऱ्याच जणांशी पटकन मैत्री जमायची. तिला आणि इतरांनाही त्याचे काही वाटायचे नाही. पण हिचा स्वभाव हळवा; म्हणून ती पटकन एखाद्या मैत्रीला, बोलण्याला आपलेसे मानायची. अशातच तिला एक छानशी लिहिणारी बोलणारी हसतमुख मैत्रीण ही मिळाली होती.

नेहमीच्या बोलण्या-चालण्यात नसल्या तरी मैत्री ही दूर राहूनही निभावता येते या उक्तीप्रमाणे तिचे मैत्र आणि परिवार वाढत चालला होता. अनेकदा भेटणे, फिरायला जाणे, बोलणे यामुळे बिनाला आनंदही मिळायचा. तसेच काही जण तिचे उपक्रम-लेख-कवितांना खास टिप्पणी द्यायचे. काही तिचे कौतुकही करायचे. सीमाला हे सगळं माहिती असायचं. ती चिडवायचीही, “बघ हं बिनू, मला विसरशील या सगळ्या नवनवीन मित्र-मैत्रीणीत!’

तेंव्हा ती म्हणायची, “नाही गं, हे सगळे असेच जनरल आहेत. तू खासच आहेस माझ्यासाठी!’ आणि मग कुठे सीमाला समाधान वाटायचे. अशाच एका घटनेने आज बिना अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात असंख्य विचारांचे थैमान माजले होते. आपलं आपलं म्हणताना तिची मैत्रीतील गुंतवणूक वाढत जात होती, गेली होती, हे तिचे तिलाही समजले नव्हते. अशातच आज रियाच्या अचानक या जगातून निघून जाण्याने तिला फार वाईट वाटत होते. सतत तिच्या सोबतच्या गप्पा आठवणी आणि अशाच काही गोष्टींमधून बिनाला रिया आठवत होती. रियाच्या कोणत्याच गोष्टी तिला फारशा माहीत नव्हत्या.

रियाच्या अचानक निघून जाण्याचे कारणही तिला माहीत नसावे आणि तिनेही काही सांगू नये, याचे तिला राहून राहून दुःख होत होते. इकडे सीमा तिला विचारात पाहून म्हणालीसुद्धा, “अगं जाऊदे फ्रेंडच होती ना! एवढं काय लावून घेते.’ आणि तिचे डोळे चमकले. “अरे म्हणजे काय झालं मग,! माणूसच होती ना ती सीमा!’ अशा वाक्‍याने सीमाच्या लक्षात आले होते की, नकळत आपली भोळी बिनू त्या मैत्रीच्या नात्यात खूप गुंतून गेली आहे.तिला सावरायला हवे. असे अनेक जण येतात जातात, काहींशी भांडणं होतात काहींशी अबोला, राग, फसवणूक या सगळ्या गोष्टी बिना सीमाला करायची त्यातून तिची किती गुंतवणूक वाढली हेही सीमाला जाणवायचे. पण आज तिची एखादी मैत्रीण गेलीय यामुळे इतकं दुःखी रडवेला चेहरा पाहून सीमालाही तिला कोणत्या शब्दात समजवावे, हे समजेना.

शेवटी तिच्या हट्टापायी बिनाला ती रियाच्या घरी घेऊन गेली.तिच्या डोळ्यातील पाण्यानी तिला श्रद्धांजली वाहून तिने तिचे दुःख हलके केले होते. सीमाशी बोलताना बिनाने तिच्या अशा मैत्रीतल्या आणि त्यामुळे तिला होणारा त्रास अनेकदा बोलून दाखवला. आणि यापुढे असे फारसे गुंतून न जाता काहीच नेहमी भेटणाऱ्या बोलणाऱ्या आणि मोजक्‍याच मैत्रिणीशी एन्जॉय सुखदुःख वाटून घेण्याचा विचार करतच सीमाला मिठी मारून गोड हसतच बाय केला.

– वृषाली वजरीनकर

Leave A Reply

Your email address will not be published.