पुणे, : अत्याचार झालेल्या मुली अथवा मुलांना पुनर्वसन, उपचारासाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सहा वर्षांत म्हणजे २०१८ पासून आजतागायत ७४० जणांना ३ कोटी २५ लाख ९० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
नुकत्याच एका प्रकरणात नातेवाकाने बलात्कार केलेल्या १० वर्षीय मुलीला दहा लाख रुपयांची मदत देण्यात आली. मुलीला मदत मिळण्यासाठी पोलिसांमार्फत विधी सेवा प्राधिकरणाकडे शिफारस करण्यात आली होती. हे प्रकरण मनोधैर्य योजनेच्या जिल्हा मंडळाच्या समितीपुढे पुढील निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. त्या समितीच्या बैठकीमध्ये समितीने गुन्ह्याचे गांभीर्य, वैद्यकीय अहवाल, मुलीचा जबाब आणि इतर कागदपत्रे तपासून तिला नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
या मुलीप्रमाणे ७४० पीडितांना गेल्या सहा वर्षांत मनोधैर्य योजनेंतर्गत ३ कोटी २५ लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली. अत्याचार झालेले बालक, बलात्काराची घटना घडलेली महिला आणि ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेंतर्गत अर्ज केला जातो.
वर्ष – मंजूर अर्ज – मंजूर रक्कम
२०१८ – १९ : ७३ : १५, ९०,०००
२०१९ – २० : ६६ : ३३, २५, ०००
२०२०-२१ : ६० : २३, ८०,०००
२०२२ – २२ : २९२ : ६३, २५,०००
२०२२ – २३ : ४१ : ६६, ५०,०००
२०२३ – २४ : २०८ : १, ३६, ७०,०००
एकूण – ७४० – ३,२५, ०९०००