हांगझोऊ :- चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष नेमबाजांनी रविवारी ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. याच गटात भारताच्या महिला नेमबाजांनी रजतपदक पटकावले.
पुरुष ट्रॅप नेमबाजीत के चेनाई, पृथ्वीराज तोंडाईमन आणि जोरावर सिंग यांनी देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. भारताच्या महिलांनी सांघिक ट्रॅप नेमबाजीत रजतपदक जिंकले. रविवारचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी विविध क्रीडा प्रकारात यशदायी ठरला. नेमबाजीत भारताने मिळवलेले हे सातवे सुवर्णपदक ठरले आहे. के चेनाई, पृथ्वीराज आणि जोरावर या त्रिकुटाने पुरुषांच्या सांघिक ट्रॅप नेमबाजीत 361 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही आजवरची सर्वोच्च गुणसंख्या ठरली आहे. यापूर्वी, भारताच्या ऐश्वर्य सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश सिंह पनवार यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. मनू भाकर, ईशा सिंग, रिदम संगवान यांनी 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच सिफ्ट कौर समरा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते. तर, अर्जुन चीमा, सरबज्योत सिंग आणि शिव नरवाल यांनीही नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.
या त्रिकुटाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ही यशस्वी कामगिरी केली. राजेश्वरी कुमारी, मनीषा कीर आणि प्रीती रजक यांनी महिला सांघिक ट्रॅप नेमबाजीत 337 गुण मिळवत रजतपदक पटकावले. भारताने एकूण 41 पदके मिळवताना 11 सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली.