कुसुम मांढरेंच्या गटातून राष्ट्रवादीला उर्जितावस्था : मताधिक्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला
शिक्रापूर- शिरूर- हवेली मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत अशोक पवार यांनी मोठ्या मताधिक्क्याने बाजी मारली आहे. शिरूर – हवेली मतदारसंघातील शिक्रापूर- सणसवाडी जिल्हा परिषद गटातून या कुसुम मांढरे यांनी आमदार अशोक पवारांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कुसुम मांढरे यांचे त्यांच्या गटावर वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.
विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले ते म्हणजे कोणत्या गावातून व कोणाच्या जिल्हा परिषद गटातून कोणाला मताधिक्य मिळाले आहे. अनेक ठिकाणी मोठ- मोठ्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला होता. इतर उमेदवारांना पाठिंबा दिलेला असल्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची निवडणूक ठरली होती. तर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार अशोक पवार यांचे विरोधक समजले जाणारे मंगलदास बांदल यांनी ऐनवेळी पवार यांचे प्रतिस्पर्धी बाबुराव पाचर्णे यांना पाठींबा दाखविला होता.
त्यामुळे बांदल यांच्या गावातून कोणाला मताधिक्य मिळणार, हा देखील चर्चेचा विषय झाला होता. शिरूर- हवेलीतील अनेक गावांमधून अशोक पवार यांना मताधिक्य मिळाले आहे. काही गावांमधून पाचर्णे यांना मताधिक्य मिळालेले आहे. परंतु जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांच्या गटातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, कासारी आदी गावांमधून अशोक पवार यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. कुसुम मांढरे यांच्या जिल्हा परिषद गटावर त्यांचे वर्चस्व तसेच आपल्या गटावर मजबूत पकड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला उर्जितावस्था आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दुणावला आहे.
- जिल्हा परिषद गटातील गावातून मिळालेले मत व आघाडी
शिक्रापूर – अशोक पवार 4892, बाबुराव पाचर्णे 3551 ( 1342 आघाडी पवार), सणसवाडी – अशोक पवार 3101, बाबुराव पाचर्णे 1760 ( 1341 आघाडी पवार), वाडा पुनर्वसन- अशोक पवार 378, बाबुराव पाचर्णे 221 ( 157 आघाडी पवार), कोरेगाव भीमा- अशोक पवार 2358, बाबुराव पाचर्णे 1934, ( 424 आघाडी पवार),
कासारी – पवार 999, बाबुराव पाचर्णे 500, ( 499 आघाडी पवार). - पदाधिकाऱ्यांच्या गावांतून पाचर्णे यांना पिछाडी
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातील कुसुम मांढरे यांच्या जिल्हा परिषद गटातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा, सणसवाडी, कासारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य पदाधिकारी असून देखील पदाधिकाऱ्यांच्या गावांतून पाचर्णे यांना पिछाडी मिळाली आहे. अशोक पवार यांना मोठी आघाडी मिळाली आहे.