लंडन :- कर्णधार बेन स्टोक्सने केलेली अफलातून दीडशतकी खेळी अखेर व्यर्थ ठरली. तो बाद झाला व इंग्लंडचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ऍशेस कसोटी मालिकेतील इंग्लंडविरुद्धची ही दुसरी कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
इंग्लंडचा दुसरा डाव 327 धावांवर आटोपला व ऑस्ट्रेलियाने हा सामना 43 धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 371 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या कर्णधार स्टोक्सह बेन डकेटने जिद्दी फलंदाजी केली. डकेट 83 धावांवर बाद झाल्यावर प्रमुख फलंदाज ज्यो रूटसह अन्य फलंदाजांनीही निराशा केली.
डकेटने आपल्या खेळीत 112 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार फटकावले. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या 5 बाद 177 धावा झाल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पराभव स्पष्ट दिसत होता. मात्र, त्याचवेळी कर्णधार स्टोक्स खेळपट्टीवर आला व त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हुकुमत गाजवली. त्याने चौकार व षटकारांची बरसात केली. त्याच्यातडाख्यातून ऑस्ट्रेलियाचा एकही गोलंदाज सुटला नाही. त्याने अर्धशतक, शतक असा पल्ला इतक्या कमी चेंडूत गाठला की त्याने इंग्लंडला विजयाची आशा दाखवली. त्याने दीडशतकी खेळी करत सामन्याची सुत्रे एकहाती घेतली होती. मात्र, 155 धावांवर तो बाद झाला आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशाही संपल्या. त्याने या खेळीत 214 चेंडूत 9 चौकार व 9 षटकार फटकावले.
जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर स्टोक्सने तळातील फलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या साथीत शतकी भागीदारी केली. त्यात ब्रॉडचा वाटा केवळ 11 धावांचा होता. या जोडीने संघाचे त्रिशतक फलकावर लावले. मात्र, स्टोक्स परतल्यावर पुन्हा एकदा सामन्यावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व निर्माण केले.
जोश टोंग व जेम्स अँडरसन यांनी 25 धावांची भागीदारी करत काही काळ उत्कंठा वाढवली होती. मात्र, मिचेल स्टार्कने टोंगला बाद करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. कॅमेरुन ग्रीनने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 416 धावा. इंग्लंड पहिला डाव – 325 धावा. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 279 धावा.
इंग्लंड दुसरा डाव – 81.3 षटकांत सर्वबाद 327 धावा. (बेन स्टोक्स 155, बेन डकेट 83, पॅट कमिन्स 3-69, मिचेल स्टार्क 3-79, जोश हेझलवूड 3-80, कॅमेरुन ग्रीन 1-73).