पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाच्या बांधकामात १४२ झाडांची कत्तल होणार असल्याच्या बातम्या प्रसिध्द होताच महापालिकेकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. उड्डाण पुलाच्या कामात बाधीत होणा-या ६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण खुलाशामध्ये देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका पिंपरी डेअरी फार्म येथील मुंबई-पुणे रेल्वे फाटकावर ५६५ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दापोडी-निगडी रस्त्याला पॉवरहाऊस चौकाशी जोडणारा हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी फायदेशीर ठरणार आहे. चार पदरी असणाऱ्या या उड्डाणपुलामध्ये छोट्या वाहनांसह अवजड वाहने पेलण्याचीही क्षमता असणार आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि आसपासच्या भागातील प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.
या उड्डाणपुलामुळे नागरिकांना सुविधा, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल ही पिंपरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. उड्डाणपुल नसल्याने या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे फाटकावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर नागरिकांच्या या समस्या दूर होणार आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर तसेच तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जलद आणि सहज पद्धतीने प्रवास करण्यासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषणही कमी होणार आहे.
सुबाभूळ, बाभूळ, गुलमोहर वृक्षांचा समावेश
उड्डाण पुलाच्या बांधकामात बाधित होणा-या वृक्षांचा विचार केला जात आहे. बांधकाम प्रक्रियेचा स्थानिक वनस्पती आणि जीवजंतूंवर होणारा परिणाम कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संरक्षण खात्याच्या जमिनीवर असलेल्या झाडांचे मूल्यांकन करून वृक्ष प्राधिकरण समितीने पुनर्रोपण तसेच वृक्षतोडीस मान्यता दिली आहे.
यामध्ये मुख्यतः सुबाभूळ, बाभूळ, गुलमोहर आणि रेनट्री या वृक्षांचा समावेश आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने ६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण स्थापत्य विभागाकडून देण्यात आले आहे.
पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पालिकेच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. येत्या काही महिन्यांत उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होईल. त्यामुळे या मार्गावरील दळणवळण गतीमान होईल.