अहमदाबाद – गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने आता गुजरात मध्ये आपले लक्ष केंद्रीत केले आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दोन नेते आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज एकत्रितपणे साबरमती येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमालाही भेट दिली. या निमीत्त त्यांनी तेथे दोन किलोमीटरचा रोड शोही केला होता.
उद्या हे नेते अहमदाबादला जाणार असून तेथे ते स्वामीनारायण मंदिराला भेट देणार आहेत. आम आदमी पक्षाच्या गुजरातमधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीलाहीं केजरीवाल मार्गदर्शन करणार आहेत. गुजरात मधील विधानसभेच्या सर्व 182 जागा लढवण्याची घोषणा केजरीवालांनी गेल्याच वर्षीै केली असून त्यासाठी त्यांनी आधीपासूनच रणनिती आखली आहे.
अलिकडेच झालेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला एकतर्फी यश मिळाल्यानंतर त्यांचा उत्साह वाढला असून त्यांनी गुजरातेत आपले लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. आम आदमी पक्षाने गुजरातमधील स्थानिक निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी जागा जिंकून आपले अस्तित्वही तेथे निर्माण केले आहे. त्यामुळे या पक्षाच्या गुजरात मधील कामगिरीवर राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.