पिंपरी, दि. 12 – युरोप, रशिया, मंगोलिया, उत्तर ध्रुवाकडील पक्षांचे पिंपरी चिंचवडमध्ये आगमन होत आहे. थंडीची चाहूल लागताच उत्तर ध्रुवाकडील पक्षी अन्नाच्या शोधात आणि संतुलीत वातावरणात आपल्या सुरक्षेसाठी इतरत्र स्थलांतर करतात. त्यात प्रामुख्याने शेकाट्या, पिवळा, राखाडी आणि पांढरा धोबी या पक्षांचे सध्या शहरात आगमन झाले आहे.
उत्तर ध्रुवावर दरवर्षी हिवाळ्यामध्ये शून्य डिग्रीच्या खाली तापमानाचा पाराचा घसरतो. त्यामुळे तळ्यातील पाणी गोठते. तसेच जमीनीवरही बर्फ असतो. त्यामुळे बर्फाळ आणि अतिथंड वातावरणातील पक्षी उबदार ठिकाणी स्थलांतर करतात. पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी हे पक्षी आश्रय घेतात. सध्या शेकाट्या, पिवळा, राखाडी आणि पांढरा धोबी हे पक्षा पहायला मिळत आहेत. रावेत येथील बांधारा, धनेश्वर मंदिर, श्री. मोरया गोसावी समाधी मंदिर परिसर, चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी, संभाजीनगर बर्ड व्हॅली, धनेश्वर मंदिर, थेरगाव बोट क्लब, दापोडी पसिरतील नदी काठी हे पक्षी दिसून येत आहेत.
पक्षी निरीक्षक उमेश वाघेला म्हणाले की, शहरीकरणामुळे थंडीचा कडाका कमी होत आहे. शहरात सिमेंटची जंगले उभी रहात आहेत. त्यामुळे म्हणावी तशी थंडी जाणवत नाही. वातावरणातील हा बदल पक्ष्यांमध्येही जाणवतो. त्यामुळे पक्ष्यांचे स्थालांतर होत असते.
अन्नाच्या शोधात पक्षी
उत्तर ध्रुवावर बर्फ वृष्टीमुळे पक्षी उबदार प्रदेशात स्थलांतर करतात. तापमानाचा पारा शुन्याच्या खाली घसरल्याने नदी, पाणवठे गोठतात. त्यामुळे तेथील अन्नही बर्फाखाली झाकून जाते. तसेच बर्फात पक्ष्यांचे राहणे धोकादायक ठरते. त्यामुळे अन्नाच्या शोधात आणि सुरक्षीत वातावरणाच्या ठिकाणी हे पक्षी स्थलांतर करतात. या पक्षांचा आधीवास हा प्रामुख्याने पाणथळाच्या जागी असतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पक्षी येथे राहतात. त्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परतात.