पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेसचे जनरल बोगी (डबे) कमी केल्याने पुणे ते मुंबईसाठी रोज प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना मिळेल तिथे जागा करावी लागत आहे. त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. त्यामुळे 500 चाकरमान्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र देत आपली नाराजी दर्शवली आहे. तसेच जनरल बोगीची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड व प्रगती एक्सप्रेस या रेल्वे गाड्या पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी जीवनवाहिन्या मानल्या जात आहेत. रेल्वे प्रशासनाने 22 मार्च 2022 पासून नव्या स्वरुपात रेल्वेसेवा सुरू केल्या आहेत. मात्र डेक्कन क्वीन व सिंहगड या दोन्ही रेल्वे गाड्यांचे जनरल बोगी कमी केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या एकच जनरल बोगी असल्यामुळे या रेल्वे गाडीत उभे राहणे देखील मुश्कील होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. जागा न मिळालेले तिकीटधारक आरक्षित किंवा मासिक पासधारकांच्या बोगीमध्ये जात आहेत. त्यामुळे मासिक पासधारकांशी वादाचे प्रसंग उभे राहत असून मासिक पासधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत तोडगा काढण्याची मागणी होत आहे.