लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात “नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्युरो’ने आज अटक वॉरंट बजावले. जमीन व्यवहारातील भ्रष्टाचारप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे. या प्रकरणात पाकिस्तानातील जंग समूहाचे मुख्य संपादक मीर शाकिलूर रेहमान यांचाही समावेश आहे. याप्रकरणी शरीफ यांना नोटीस आणि चौकशीसाठीची प्रश्नावलीही पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळ्ला नाही. शरीफ सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहेत, असे “एनएबी’च्या अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
जंग ग्रुपलाच जिओ ग्रुप म्हणूनही संबोधले जाते. दुबईस्थित इंडिपेंडन्ट मीडिया कॉर्पोरेशनचीच ही उपकंपनी आहे. नवाझ शरीफ यांना फरार आरोपी घोषित करावे यासाठी “एनएबी’कडून उत्तरदायी न्यायालयात अर्ज केल जाईल. त्यांना फरार आरोपी घोषित केल्यानंतर त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी “एनएबी’ने 12 मार्च रोजी मीर शकलूर रेहमान यांना अटक केली होती. त्यांना “एनएबी’ची कोठडी सुनावण्यात आली आहे.
शरीफ यांना अल अझिझिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना उपचारांसाठी लंडनला जायला चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला. तेव्हापासून शरीफ लंडनमध्येच आहेत.