जम्मू – लष्कराच्या एका वरीष्ठ कमांडरने आज गुप्तचर खात्यातील वरीष्ठांशी आणि अन्य सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. कोणत्याही आव्हानात्मक स्थितीचा मुकाबला करण्यासाठी उच्चप्रतीची सिद्धता ठेवली जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्याला पोलिस, निमलष्करी दलाचेही अधिकारी उपस्थित होते. जम्मू काश्मीरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी जी सिद्धता ठेवली आहे त्याचेही त्यांनी कौतुक केले.
जम्मू काश्मीरात कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी पोलिस व निमलष्करी दलांबरोबरच लष्करालाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख जातीने अन्य दलांच्या बरोबर समन्वयाच्या बैठका घेत आहेत.