लंडन – जागतिक अव्वल मानांकित फुटबॉलपटू व कर्णधार लिओनेल मेस्सी व लौटारो मार्टिनेझ यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीत अर्जेंटिनाने इटलीचा 3-0 असा सहज पराभव करत फिनालिसिमा करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेते आणि युरो चषकाचे विजेते यांच्यात यंदा पहिल्यांदाच फिनालिसिमा करंडकासाठी सामना खेळवण्यात आला. वेम्बली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 28व्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर मार्टिनेझने गोल करत अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली.
मग मार्टिनेझच्या साहाय्याने अँजेल डिमारियाने गोल झळकावल्याने मध्यंतराला अर्जेंटिनाकडे 2-0 अशी आघाडी होती. उत्तरार्धात मेस्सीच्या पासवर पाव्लो डिबालाने गोल केल्यामुळे अर्जेंटिनाने हा सामना 3-0 अशा फरकाने जिंकला.