- आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
वडगाव मावळ – येथील मावळ न्यायालयाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरला मंजुरी मिळाली आहे. मावळ तालुक्यातील वकील व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वकील बांधवांनी पेढे वाटून जल्लोष केला.
मावळ तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत फौजदारी व दिवाणी गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. पोलीस व नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शिवाजीनगर (पुणे) येथे जावे लागत आहे. त्यामुळे मावळ वकील बार, लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्याकडे ही न्यायालये मावळ येथे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार आमदार शेळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला.
मुंबई मंत्रालय येथे कॅबिनेट मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत वडगाव मावळात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरला मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारचे माजी अध्यक्ष ऍड. नामदेव दाभाडे उपस्थित होते. वकील, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांचे विशेष आभार मानून सत्कार केला. या वेळी ऍड. श्रीराम कुबेर, ऍड. प्रताप शेलार, ऍड. अजित वहिले, ऍड. धनंजय कोद्रे, ऍड. सोमनाथ पवळे, ऍड. मुणाफ शेख, ऍड सुधीर भोंगाडे, ऍड. दीपक चौधरी, ऍड. स्वामी फुगे, ऍड. राम शहाणे, ऍड. तन्वीर जहागीरदार, ऍड. मिलिंद ओव्हाळ व वकील उपस्थित होते.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर झाल्याने वकील, पोलीस व नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. गुन्ह्यांचा निकाल लवकर लागला जाईल. वकिलांना नवीन संधी निर्माण झाली आहे.
– तुकाराम काटे, वकील38 वर्षांपासूनची ही मागणी आहे. त्यासाठी मागील दोन वर्षांपासून लिगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने पाठपुरावा करत होते. आमदार सुनील शेळके यांनी सहा महिन्यांत वारंवार पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला.
– विठ्ठल पिंपळे, वकील