हडपसर – महापालिकेने सर्व शहराचा कचरा माथी मारून हडपसरची कचरा नगरी केली आहे. सत्ताधारी केवळ पोकळ आश्वासने देऊन या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. ओपन डंपिंग बंद असताना अनधिकृतपणे लाखों टन कचरा येथे रचून ठेवला आहे. कचरा प्रक्रिया केवळ नावाला आहे. येथील कचरा प्रकल्प आणि ओपिन डंपिंग बंद करावेत, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली आहे.
कचरा प्रकल्प आणि उघड्यावर साठवलेल्या कचऱ्याची समस्या जाणून घेण्यासाठी कचरा प्रकल्पाच्या ठिकाणीच चहापान ठेवण्यात आले होते. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले की, हडपसर विधानसभा मतदार संघात रोकेम, व्हेरिअंट, बायो मायनिंग, भुमीग्रीन हे कचरा प्रकल्प आहेत. तसेच, केशवनगर येथे एक कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे. येवलेवाडी येथे देखील कचरा प्रक्रीया प्रकल्पासाठी आरक्षित जागा आहे. मात्र, शहरातील सर्व कचरा हडपसर-रामटेकडी येथे आणला जातो. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानी नसताना येथे सुमारे एक लाख मेट्रीक टन कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. मी सभागृहात हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला. मात्र, पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या राक्षसी बहुमतामुळे येथे कचरा प्रकीया प्रकल्प सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत मी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
हडपसरच्या माथी मारलेले कचरा प्रकल्प बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून मतदार संघातील संपूर्ण रहिवाशांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही ससाणे यांनी केले आहे.
कचरा प्रकिया केंद्रालगत असलेल्या सोसायटीतील नागरिकांनी सांगितले की, उघड्यावर कचरा डंपिंग केले जात असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. हा प्रकल्प बंद करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
केवळ पोकळ आश्वासने…
हडपसर-रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्यात यावा. ओपन डंपिंग बंद करावेत तसेच नवीन होणाऱ्या प्रकल्पाचे काम बंद करावे, अशी मागणी करत यापूर्वी माजी खासदार, काही माजी आमदार, मंत्री तसेच काही माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवक आणि नागरिकांनी आंदोलन केले. यावर पालिका अधिकारी यांचे पाहणी दौरेही झाले. मात्र ,केवळ पोकळ आश्वासने देऊन हे प्रकल्प असेच सुरू राहिले आहेत. आता, तर बिनधास्तपणे ओपन डंपिंग केले जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना होणाऱ्या या त्रासाचे कोण राजकारण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.