नवी दिल्ली – सुकेश चंद्रशेखर हा 32 वर्षांचा कोट्याधीश तरूण सध्या सगळ्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. विशेषतः जॅकलिन फर्नांडिस, नोरा फतेही, रणबक्षी या औषध कंपनीचे
तुरुंगात असलेले मालक शिवेंद्रसिंग यांची नावे या प्रकरणात आल्यानंतर तर सुकेशची फसवण्याची कार्यपद्धती आणि हुशारी पाहून तर पोलिस आणि सगळ्यांवरच चकीत होण्याची वेळ आली आहे.
सुकेश चंद्रशेखर या प्रकरणात ईडीचे अधिकारी सर्वांचीच कसून चौकशी करत आहेत. यामध्ये अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांचाही समावेश असून या दोघींची ही चौकशी करण्यात आली आहे.
पण ईडीच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फक्त जॅकलिन आणि नोराच नाही तर अजून पाच अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या असं समोर आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, ईडीने या पाच अभिनेत्रींची यादी तयार केली असून त्यांच्यात आणि सुकेशमध्ये नेमके काय संबंध होते याचा तपास केला जात आहे. या अभिनेत्रींनाही भेटवस्तू देण्यात आल्या होत्या किंवा त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुकेशच्या संपर्कात होत्या.
या सर्व गोष्टींचा तपास आता ईडीचे अधिकारी लावणार आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या प्रकरणाला आणखी कोणते वेगळे वळण येणार हे सांगता येत नाही.