पुणे -“डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनीट्रॅप) अडकवल्या प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आतापर्यंत आठ जणांचे जबाब नोंदविले आहेत. या तपासात नाशिकमधील दोन मोबाइल क्रमांक सापडले असून संबंधितांचा शोध सुरू आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपावरुन डॉ. कुरुलकर यांना एटीएसने अटक केली.
कुरुलकर यांना विशेष न्यायालयाने 29 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना येरवडा कारागृहातील विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे.या प्रकरणात समाज माध्यमांतील संवादांचे विश्लेषण करण्यात आले आहे. कुुरुलकर यांच्या मोबाइल क्रमांक, तसेच मोबाइल संचातील माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
दिघी डीआरडीओ कार्यालयातील अधिकाऱ्याचा, तर कुरुलकर यांच्या कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका व्यक्तीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात नाशिक येथील मोबाइल क्रमांकाचे वापरकर्ते कोण आहेत, या दृष्टीने तपास सुरू आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे.
मोबाइल क्रमांक नागपूरचा,वापरकर्ता बंगळुरू हवाई दलात
डॉ. कुरुलकर यांना “झारा दासगुप्ता’ असे नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेराने जाळ्यात अडकवले आणि गोपनीय माहिती मिळवली. कुरुलकर यांनी दासगुप्ताचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. तेव्हा तिने दुसऱ्या एका क्रमांकावरून संपर्क साधला होता. संबंधित मोबाइल क्रमांक नागपूरमधील आहे. त्या मोबाइल क्रमांकाचा वापरकर्ता बंगळुरूतील हवाई दलाच्या तळावरील एक कर्मचारी असल्याचे उघडकीस आले होते.