सातारा – गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करुन गडकिल्ल्यांचा वारसा पुढच्या पिढीला कळावा यासाठी अनपटवाडी (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल किल्ले वंदनगडावर काढण्यात आली. “एक दिवस किल्ल्यांसाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी इतिहासाची माहिती प्रत्यक्ष भेट देवून जाणून घेतली.
गडकिल्ले ही आपली भूषणे आहेत. विद्यार्थ्यांना गडकोट दाखवून किल्ल्यावरील अवशेषांची त्यांना ओळख करुन देत गडकिल्ल्यांचा इतिहास सांगितला पाहिजे, यासाठी अनेक शाळा विविध गडकिल्ल्यांना भेटी देऊन इतिहास जागवतात. अशाच प्रकारे अनपटवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रावणी सोमवारनिमित्त किल्ले वंदनगडावर शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. दरवर्षी अनपटवाडी शाळेची एक श्रावण सहल ठरलेली असते. यावर्षी श्रावण सहलीबरोबरच एक किल्ला पहावा असे ठरले.
जवळच असलेल्या चंदन व वंदन गडावर जाण्याचे नियोजन करण्यात आले. चंदन कोरेगाव तालुक्यात व वंदनगड वाई तालुक्यात अशी या किल्ल्यांची रचना. मात्र, इतिहासाची ओळख करुन देणारे बरेचसे अवशेष वंदनगडावर आहेत. त्यामुळे ही सहल किल्ले वंदनगडावर आयोजित केली होती. शाळेतील शिक्षक प्रकाश फडतरे, उद्धव पवार, संदीप सावंत, स्वयंसेवक करिश्मा मुळीक यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
ऐतिहासिक वास्तूंची घेतली माहिती
वंदन गडावर असलेले दोन दरवाजे, चोर दरवाजा, पहारेकऱ्यांच्या देवड्या, दरवाजाचा आडणा, दरवाजावरील नक्षीकाम, शिल्प, वेगवेगळ्या भाषेतले शिलालेख, तटबंदी, चुन्याचा घाणा, घरांच्या बांधकामाचे अवशेष, वाड्याचे अवशेष, बालेकिल्ला, शिववंदनेश्वराचे मंदिर, धान्याचे कोठार, दारूगोळा कोठार, अनेक वीरांच्या समाध्या, पाण्याचे टाके, दर्गा अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंची दाखवून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.