मालेगाव/लडाख- लडाख सीमेवर चीन लष्करासोबत झालेल्या संघर्षात मालेगावच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असताना नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना
मालेगाव तालुक्यातील छटा साकुरी झाप येथील सचिन मोरे शहीद झाले. शहीद सचिन मोरे यांना वीरमरण आल्याने त्यांची आई, वडील, पत्नी, मुलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. साकुरीगावावर शोककळा पसरली आहे.
चिनी सैनिकांची घुसखोरी वाढल्याने लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात तणावपूर्ण वातावरण आहे. संघर्षात वीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच चीनने नदीच्या पाण्याचा हत्याराप्रमाणेवापर केला. सीमेलगत भागात नदीवर पूल बांधणीचे काम सुरु असताना चीनने रोखलेला पाण्याचा प्रवाह सोडला. अचानक पाणीपातळी वाढून तीन भारतीय जवान प्रवाहात सापडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र मोठ्या दगडावर पडल्याने त्यांना वीरमरण आले.
शहीद सचिन मोरे हे एसपी 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्ष अभियांत्रिकी विभागात ते कार्यरत होते.श हीद सचिन मोरे यांच्या पश्चात आई-वडील,
पत्नी, दोन मुली, सहा महिन्यांचा मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री पुणे येथे, तर शनिवारी साकुरी येथे आणल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.