टोरांटो – भारतीय वंशाच्या अनिता आनंद या कॅनडाच्या संरक्षण मंत्री झाल्या आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काल मंत्रिमंडळाची फेररचना केली. महिन्याभरापूर्वीच घेण्यात आलेल्या मुदतपूर्व निवडणुकांमध्ये ट्रुडो यांच्या लिबरल पार्टीने विजय मिळवून सत्ता संपादन केल्यापासून प्रथमच मंत्रिमंडळाची फेररचना करण्यात आली आहे.
देशात लष्करी यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा व्हाव्यात अशी मागणी होत असताना आनंद यांनी संरक्षण मंत्रीपद स्वीकरले आहे. कॉर्पोरेट लॉयर असलेल्या अनिता आनंद यांनी कॉर्पोरेट प्रशासनात दीर्घकाळ काम केले आहे.
भारतीय वंशाचेच हरजीत सिंग सज्जन हे दीर्घ काळापासून कॅनडाचे संरक्षण मंत्री होते. आनंद सिंग यांच्याच जागेवर संरक्षण मंत्री झाल्या आहेत. लष्करातील लैंगिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमुळे संरक्षण मंत्र्यांवर मोठी टीका व्हायला लागली होती.
फेरबदलानंतर सज्जन यांना आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे मंत्री करण्यात आले आहे. संरत्रण मंत्री पदासाठी आनंद या प्रमुख दावेदार मानल्या जात होत्या. लष्करातील लैंगिक गैरव्यवहारातील पीडीतांसाठी ही फारच सकारात्मक बाब मानली जात आहे. नवीन मंत्रिमंडळात लैंगिक समानता साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळात एकूण 38 मंत्री आहेत.