सातारा – सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांत गोवर्गीय जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून येत आहे. सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव असून एका दीड वर्षाच्या कालवडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हयातील सर्व गोवर्गीय बाजार तसेच गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी घालण्यात आल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले आहेत.
फलटण, कराड, कोरेगाव, माण, खटाव या तालुक्यांत लंपी स्किनची लागण झाली आहे. 26 गाय व 15 बैल अशा 41 जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. एका जनावराचा मृत्यू झाला असून 3 जनावरे नियमित औषधोचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण 3 लाख 52 हजार 436 गोवर्गीय जनावरांपैकी 3 लाख 23 हजार 67 जनावरांचे लंपी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.