कोर्टकचेरीसाठी विकावे लागले सगळे दागिने

मुंबई – कधीकाळी देशातल्या अग्रगण्या उद्योगपतींमध्ये ज्यांची गणना केली जात होती, त्या अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असून ते पूर्णत: कर्जबाजारी झाले आहेत. आपण अत्यंत सामान्य आयुष्य जगत असून आपल्याकडे आता एकच कार राहीली असल्याचे अनिल यांनी ब्रिटनच्या एका न्यायालयात सांगितले आहे.

भारतातील सुप्रसिध्द उद्योजक धीरूभाई अंबानी यांचे धाकटे पुत्र आणि देशातील सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेल्या मुकेश अंबानी यांचे बंधु अशी अनिल अंबानी यांची ओळख. एक काळ किंबहुना दशक दीड दशकापूर्वी देशात अनिल अंबानी यांचा प्रचंड दबदबा होता. मात्र आज विविध न्यायालयांत सुरू असलेल्या केसेस लढण्याकरता वकीलांची फी द्यायालाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्याकरता त्यांना आपल्याकडचे दागिने विकावे लागले असल्याचे त्यांनीच ब्रिटनमधील न्यायालयाला आपल्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती देताना सांगितले आहे.

चीनी बॅंकांचे कर्ज परतफेड करू न शकल्याच्या प्रकरणात अनिल यांनी शुक्रवारी ब्रिटनच्या न्यायालयात आपली बाजू मांडली. व्हिडिओ लींकच्या माध्यमातून हजर झालेल्या अनिल यांना तब्बल तीन तास प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांची संपत्ती, त्यांच्यावरचे कर्ज आणि त्यांचा खर्च याबाबत त्यांना प्रश्‍न विचारले गेले.

यावर्षी जानेवारी ते जून या काळात आपण 9.9 कोटींचे दागिने विकले असल्याचे व आता आपल्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू राहीली नसल्याचे अनिल यांनी न्यायालयाला सांगितले.
त्यांच्याकडच्या अलिशान गाड्यांबद्दल ते म्हणाले की या सगळ्या माध्यमांनी पसरवलेल्या अफवा आहेत. माझ्याकडे रोल्स रॉईस कधीच नव्हती आणि आता माझ्याकडे एकच कार आहे. दरम्यान, अनिल अंबानी नेहमीच सामान्य आयुष्य जगले मात्र त्यांच्याबाबत विनाकारण अफवा पसरवल्या जात असतात असे सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

आपले खर्च फार कमी आहेत. आपली पत्नी आणि कुटुंबाकडून तो केला जातो आणि कोणतेही अलिशान आयुष्य आपण जगत नाही. उत्पन्नाचा अन्य कोणता पर्यायही आपल्याकडे नाही. न्यायालयातील खटल्यांचा खर्च आपण दागिने विकून भागवत असून अन्य कर्ज व खर्चासाठी इतर मालमत्ता विकण्याची अनुमती दिली जावी अशी न्यायालयाला विनंती राहील.

अनिल अंबानी यांनी चीनच्या तीन बॅंकांचे कर्ज फेडावे असा आदेश ब्रिटनमधील न्यायालयाने त्यांना 22 मे रोजी दिला होता. 5281 कोटींचे कर्ज आणि खटल्यासाठीचा अतिरिक्त 7 कोटी खर्च संबंधित बॅंकाना द्यावा असेही न्यायालयाने त्यांना सांगितले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.