नवी दिल्ली – स्वतःचा काहीही फायदा होणार नसतानाही ऍमेझॉन कंपनी फ्युचर समूहाचा रिलायन्स बरोबर व्यवहार होण्यात अडथळे आणीत आहे, असा आरोप फ्युचर उद्योग समूहाचे प्रमुख किशोर बियाणी यांनी केला आहे.
फ्युचर समुहाने आपली बहुतांश मालमत्ता 24,713 कोटी रुपयांना रिलायन्सला विकण्याचा निर्णय घेतला आहे. याला अमेझॉनने न्यायालयात आव्हान दिले आहे. हा मेझॉनचा प्रयत्न म्हणजे स्वत:चा फायदा नसतांना विनाकारण इतरांना त्रास देण्याचा प्रकार आहे. आम्ही केलेला व्यवहार कायदेशीर असून भारतीय स्पर्धा आयोग आणि बाजार नियंत्रक सेबीने या व्यवहाराला परवानगी दिली आहे.
मात्र अमेझॉन कंपनी दिल्ली उच्च न्यायालयात गेली असून हा व्यवहार होऊ नये अशी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर बिर्याणी यांच्या अटकेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याबाबत बियाणी यांनी सांगितले की, फ्यूचर- रिलायन्स व्यवहारा संबंधात ऍमेझॉन अफवा पसरवीत आहे. गरज नसताना प्रचार मोहीम राबवीत आहे.
फ्युचर समूहाच्या कर्मचाऱ्यांना या व्यवहाराची माहिती आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आम्ही घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्या अगोदर ऍमेझॉन कंपनीला या संदर्भात आवश्यक ती माहिती वेळोवेळी दिली आहे.