satara | पाच वर्षात आढळले १०४० संशयित कर्करुग्ण

सातारा, (प्रतिनिधी)- अतिशय अल्पावधीत रूग्णांचा विश्वास संपादन करून नावारूपाला आलेल्या सातारा येथील आँन्को लाईफ कँन्सर सेंटरतर्फे दरवर्षी कर्करुग्णांकरिता विविध उपक्रम राबविले जातात. आँन्को लाईफ कँन्सर सेंटर आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षात कर्करोग तपासणीसाठी २६५ शिबिरांचे आयोजन केले असून या शिबिरांतर्गत सुमारे १०४० संशयित कर्करुग्ण सापडले आहेत.
सातारा, पुणे आणि कोल्हापुर भागात आयोजित या शिबिरांमध्ये २६,५०० नागरिक सहभागी झाले होते. आढळलेल्या १०४० संशयित कर्करुग्णांमध्ये ३५ ते ६५ या वयोगटातील ६१५ पुरुष, ४२५ महिलांचा समावेश आहे. या कर्करोग तपासणी शिबीरांतर्गत निदान झालेल्या कर्करोगाच्या प्रकारापैकी पुरुषांमध्ये हेड ॲण्ड नेक कॅन्सर तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून आले.
या शिबिरातंर्गत मौखिक तपासणी करण्यात आली. ती सकारात्मक आढळल्यावर बायोप्सी करण्यात आली. महिलांमध्ये ब्रेस्ट पाल्पेशन करण्यात आले. ही पाल्पेशन चाचणी सकारात्मक आढळल्यास मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करण्यात आली. तसेच व्हीआयए चाचणी (व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसिटिक ॲसिड तपासणी) करुन सकारात्मक निकाल आल्यास पॅप स्मिअर चाचणी करण्यात आली.
शिबिरांमुळे वेळेत उपचार – देशमुख
या शिबिरांमधून आढळलेल्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले. उपचार केलेल्या रूग्णांपैकी ८९७ रुग्णांना केमोथेरेपी करण्यात आली. तर १६४ रुग्णांवर रेडिएशन थेरेपी केली आहे. या शिबिरांमुळे प्रथम व द्वितीय श्रेणीच्या रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास मदत होते व त्यांना पूर्णत: बरे वाटते, असे आँन्को लाईफ कँन्सर सेंटरचे चेअरमन उदय देशमुख यांनी सांगितले.





