पुणे -सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून राजारामपूल ते फनटाईम चित्रपटगृहापर्यंत दोन उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. या उड्डाणपुलाच्या कामातच मेट्रो प्रकल्पासाठीचे 31 खांब उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी 11 कोटींचा खर्च येणार असून, महामेट्रोने त्यास संमती दिली आहे. हा खर्च तूर्तास महापालिका करणार असून, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या मेट्रोच्या हिश्श्यातून तो वजा केला जाणार आहे. या खांबाच्या उभारणीचे काम मेट्रोच्या देखरेखीखाली होणार असून, त्याचे डिझाइनही महामेट्रोच तयार करणार आहे. या दोन उड्डाणपुलांवर सहा ठिकाणी चढण्याचे आणि उतरण्याचे रॅम्प असून, या रॅम्पच्या रचनेतच हे खांब आहेत.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून राजाराम पूल येथे एक तर विठ्ठलवाडी ते फनटाईमपर्यंत दुसरा पूल असणार आहे. या रस्त्यावर मेट्रो प्रस्तावित असून, पूलाच्या मार्गात महामेट्रोचे सुमारे 106 खांब येतात. तर यातील स्थानकाचे खांब रस्त्याच्या कडेने तर मार्गाचे खांब रस्त्याच्या मधून आहेत. त्यामुळे महापालिकेकडून पूलाचे काम करतानाच मेट्रोचे खांबही करण्यात येत आहेत.
मात्र, हे दोन्ही पूल जिथे चढतात आणि उतरतात तिथे मेट्रोची स्थानके असून, त्यांचे 31 खांब या चढण्या-उतरण्याच्या रॅम्पमध्ये येतात. त्यामुळे भविष्यात मेट्रोचे काम करायचे झाल्यास हे रॅम्प फोडावे लागतील. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने महामेट्रोसोबत आधीच चर्चा केली होती. त्यानुसार, त्यांनी काम करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, मेट्रो मार्ग अद्याप मंजुरीच्या प्रतिक्षेत असल्याने खर्च कोणी करायचा यावरून पेच निर्माण झाला होता. त्यामुळे, महापालिकेने तूर्तास पुलाच्या कामातच या खर्चाचे दायित्व स्विकारले असून, भविष्यात प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर महामेट्रोला महापालिका देय असलेल्या रकमेतून हा खर्च कमी केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.