जावळी तालुक्‍यात दारू पुन्हा जोमात

प्रशासनाचे दुर्लक्ष, व्यसनमुक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडणार

मेढा – जावळी तालुका दारूबंदीचा राज्यातील पहिला तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, आता याच तालुक्‍यात दारूचा पूर वाहत असल्याने पोलिस व उत्पादन शुल्क विभाग याच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. तालुक्‍यात अवैध धंद्याना थारा देणार नसल्याचे मेढा पोलिस स्टेशनचे सपोनी नीळकंठ राठोड यांनी सांगितले असले तरीहि कुडाळ, सोनगाव, सायगाव, बीभवी परिसरात छुप्या पध्दतीने अवैध दारु विक्री चालू आहे. छापा टाकूनही जाग्यावर काहीच मिळत नसलेल्या या अवैध दारु धंद्याबाबत सपोनी राठोड काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान तालुक्‍यातील अवैद्य धंद्यांवर आळा बसविणे त्यांच्यासमोर आव्हानच ठरणार आहे.

मध्यंतरी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे काहीकाळ वचक निर्माण झाला होता. मात्र काही पुन्हा दारू विक्रीला जोर आला आहे. अवैध दारू विक्रीचे रॅकेट स्ट्रॉंग असल्याचे दिसून येते. या दारू धंद्यावर धाड घालूनही त्याजागी मात्र काहीच सापडत नाही. यावरुन अवैध दारू विक्रेते पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहेत. दारूबंदीचा कोणताही ठोस परिणाम तालुक्‍यातील दारू धंद्यावर झाल्याचे दिसून येत नाही. परिणामी उलट दारू धंदा वाढला आहे.

यात पेट्रोलपंपानजीकच्या धाब्यावर तर अक्षरशः दारूचा पूर प्रशासनाच्या वरदहस्ताने चालू असल्याचे बोलले जात आहे. दारूच्या छुप्या पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा घालण्यास पोलिस प्रशासन कमी पडल्याचे बोलले जाते. दारूबंदीनंतर ग्रामीण भागात दारू येतेच कशी? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तालुक्‍यात दारूच्या आहारी जावून अनेक मारामारी घटना घडल्या आहेत. यामध्ये काही गंभीर खुनासारख्या घटनांचाही समावेश आहे. याकडे संबंधित विभागाकडून पाहिजे तितक्‍या गांभीर्याने पाहिले जात नसल्याने दारूविक्रीला जावळी तालुक्‍यात पुन्हा बळ आले आहे. त्यामुळे पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

अवैध विक्रीत जावळी अग्रेसर
जावळी तालुक्‍यात दारू विक्रेत्यांनी काही वेळ झोपेचे सोंग घेऊन पुन्हा दारू विक्री जोमात सुरू केलली आहे. विशेष म्हणजे अनेकठिकाणी ढाब्यांवर दारू विक्री सुरू आहे. मूळ किंमतीच्या दुप्पट रक्कमेने ही दारू विक्री केली जात आहे. रोजची दारू विक्रीची उलाढाल पाहता जावळी तालुका दारू विक्रीमध्ये क्रमांक एकला पोचला असल्याचे मतही काही अधिकारी सांगत आहेत.

दारू विक्रेत्यांना पोलिसांचे अभय?
जावळी तालुक्‍यात छुप्यापद्धतीने दारू विक्री करणारे विक्रेते आता तोंडवर करून खुलेआम विक्री करू लागले आहेत. तालुका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे, यावर वरिष्ठांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जावळी तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या नागरिकालाही अगदी सहज दारू उपलब्ध होते. त्यामुळे या विक्रेत्यांचे नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे असे दिसून येते. मात्र तरीही ठोस कारवाई होत नसल्याने दारू विक्रेत्यांना पोलिसांचे अभय मिळत आहे का? अशी चर्चा सुरू आहे.

देशातील पहिला दारूदुकानमुक्त तालुका म्हणून 2009 साली जावळी तालुक्‍याचा गौरव झाला. व्यसनमुक्त युवक संघ व महिला रणरागिनींनी अतुलनीय असा लढा उभा केला. पण मुठभर अवैध दारूविक्रेत्यांना उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांकडून मिळणारे अभय व हप्तेखोरीमुळे पुन्हा एकदा दारूविक्री बोकाळली आहे. या अवैध दारूविक्रेत्यांवर तातडीने कारवाई व्हावी अन्यथा महिला भगिनी व व्यसनमुक्त युवक संघ कायदा हातात घेवून तीव्र आंदोलन करेल.

-विलासबाबा जवळ, उपाध्यक्ष व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)