आळंदी – जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यंदाचे 336 वे वर्षे आणि फेसबुक दिंडीचे 11 वे वर्षे असून, फेसबुक दिंडी नेहमीच पालखीच्या फोटो आणि व्हिडिओ अपडेट्स सोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीकोनातून नवनवीन उपक्रम घेऊन येत असतो, आजवर फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या विविध सामाजिक मोहिमांना भरभरून प्रतिसाद मिळत गेला आहे.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविसी हाती धरुनियां ।।
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार। चालविसी भार सवे माझा ।।
यावर्षी करोनाच्या महामारीमुळे वारीचे स्वरूप वेगळे आहे, पण आपल्या मनाच्या गाभाऱ्यातील पांडुरंगाला स्मरून यावर्षीची पंढरीची वारी साजरी करूयात. फेसबुक दिंडी दरवर्षी आपल्या वारकऱ्यांसाठी वारीच्या प्रत्यक्ष अनुभूती सोबत एक सामाजिक उपक्रम घेऊन येते.
फेसबुक दिंडीचे जलसंधारण मोहीम, वारी ती ची, नेत्रवारी, देह पंढरी – अवयव दान मोहीम आणि आठवणीतील वारी हे सामाजिक उपक्रम राबविले जात असून यावर्षी ‘आधार वारी’ या संकल्पनेतून फेसबुक दिंडी आणि आम्ही वारकरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक सामाजिक उपक्रम घेऊन येत आहे.
आधार वारी अंतर्गत करोना काळात ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत, त्यांना सामाजिक जबाबदारी म्हणून आधार देण्याचे काम करणार आहे, असे आम्ही वारकरीचे रामभाऊ चोपदार आणि फेसबुक दिंडीचे स्वप्निल मोरे यांनी सांगितले.
आधार वारीत सहभागी होण्यासाठी आपल्या आसपासच्या / माहितीतल्या ज्या पाल्यांचे पालक करोनामुळे मृत पावले असतील, अशांची माहिती (99227 78044) देण्यात यावी यासाठी आम्ही वारकरी संस्थेचे रामभाऊ चोपदर, सचिन पवार, किरण कामठे आणि फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्नील मोरे, संतोष पाटील, अमोल निंबाळकर, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी, अमोल गावडे कार्यरत आहेत.