पिंपरी – महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या शनिवार (दि. 16) रोजी शहरात येणार आहेत. अजित पवार यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध विकास कामांची भुमिपूजने, उद्घाटने होणार आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय राजवटीत पवार यांचा दौरा महत्वाचा समजला जात असून ते काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी सकाळी सात वाजता महापालिका मुख्यालयात उपमुख्यमंत्री पवार येणार आहेत. सुरुवातीला त्यांच्या हस्ते उद्योग सुविधा कक्षाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर शहर पोलिसांना बंदोबस्तासाठी 50 स्मार्ट बाईक हस्तांतरीत करण्याचा कार्यक्रम होईल. महापालिकेच्या धडक कारवाई पथकाला आवश्यक वाहनांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कासारवाडी येथील क्रीडा संकुल, मैदानाचे उद्घाटन, भोसरी येथील सखुबाई गबाजी गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळाचे भुमिपूजन, तळवडे येथील जॉगिंग सेंटर व नव्याने विकसीत केलेल्या उद्यानाचे उद्घाटन, तळवडे चौक सुशोभिकरण तसेच महिला व विद्यार्थांकरिता सुरु होणाऱ्या एमएससीआयटी केंद्राचे उद्घाटन, पिंपळे गुरव येथील लिंबोणी पार्कातील सीसीटीव्ही यंत्रणेचे भुमिपूजन, पिंपळे सौदागर रोड येथे स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन आणि शेवटी साडेनऊ वाजता वाकड येथील कै. तानाजी तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन होणार आहे.
==