कोपरगाव (प्रतिनिधी) – नव्याने तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झालेले कैलास राहणे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष संघटन मजबूत करून तळागाळातील समस्या जाणून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील बहादरपूर येथील माजी सरपंच कैलास राहणे यांची कोपरगाव तालुका भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना तालुकाध्यक्ष राहणे म्हणाले की, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी पक्षाची दोन्ही पदे देऊन बहादरपूर व बहादराबादवर मोठी जबाबदारी टाकली, यासंधीचे सोने करू. दुष्काळात बिपीन कोल्हे यांनी केलेले काम व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची विकासाची रणनिती अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न करू. याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक उपस्थित होते.