नेवासा – अहमदनगर येथे शनिवार दि.३ रोजी झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नेवासा तालुका सकल मराठा समाज बांधवांनी नामदार भुजबळ यांचा तीव्र निषेध करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देवून निषेध केला आहे.
सकल मराठा समाजाचे नेते अॅड.के. एच.वाखुरे, भाऊसाहेब वाघ,अनिल ताके,दिपक धनगे,बंडू शिंदे,गणेश चौगुले,संदीप आलवणे आदींनी नेवासा तहसीलदारांकडे निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त करत निवेदनाचे यावेळी वाचन केले. निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळातील एक मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथे झालेल्या सभेत अतिशय खालच्या भाषेत चिथावणीखोर भाषण करून दोन नव्हे तर सर्वच समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. त्यांनी मराठा समाजाची न्हावी समाजाने हजामती करू नये, असे आवाहन करून या दोन समाजात तेढ निर्माण केली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे दबावतंत्र म्हणून राजीनामा देण्याचे नाटक करीत आहेत. शेरो श्यारीच्या माध्यमातून भावना भडकावल्या जात आहेत. गाव खेड्यातील बहुजन समाज गुण्या गोविंदाने राहत आहे जर खरोखर एकमेकांच्या व्यवसायात अश्या पद्धतीने द्वेष निर्माण झाला. तर अर्थव्यवस्था कोलमडून जाईल व राज्यात अराजकता माजेल .करोना काळातले हाल अपेष्टा जनता अजून विसरलेली नाहीत, त्यात हा भुजबळ प्रणित करोना जर आला तर बहुजन समाजाचे ऐक्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वेळीच भुजबळ यांची हकालपट्टी करून राज्य एका संभाव्य धोक्यापासून वाचवावे.” सदर निवेदनाची प्रत पोलीस स्टेशनलाही देण्यात आली आहे.