Eknath Shinde – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा कुख्यात गुंड हेमंत दाभेकरसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील एका गुंडासोबत फोटो समोर आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हा फोटो शेअर करत गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
संजय राऊत यांचे ट्वीट-
पुण्यातील गुंड निलेश घायवळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. संजय राऊत यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. “महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा. कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी-शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.”, असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज:
गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य!
हे महाशय कोण आहेत?
त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे… pic.twitter.com/n1L3722t1c— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2024
कोण आहे निलेश घायवळ?
पुण्यात गॅंगस्टर निलेश घायवळ याच्यावरपुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात 14 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणे, खून, खूनाचा प्रयत्न या सारखे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी 2021 मध्ये त्याच्याविरोधात मोक्काची कारवाई केली होती. पुण्यातील येरवडा कारागृहात घायवळ होता.
दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हेमंत दाभेकर हा शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. त्याची भेट घेतल्याने संजय राऊत यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला होता.