राहुरी – वांबोरी येथे मुक्कामी असलेल्या एसटी बसमधून पहाटेच्या दरम्यान बसच्या चालक व वाहकाने डिझेल चोरी करत असताना दोन भामट्यांना रंगेहाथ पकडले. एक भामटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर एकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुखदेव नाथु ढाकणे हे शेवगाव डेपो येथे बस चालक म्हणून नोकरी करतात. दि. २९ नोव्हेंबर रोजी सुखदेव ढाकणे व बसचे वाहक रामदास देवराम ज-हाड हे शेवगाव आगाराची एस.टी. बस (एम.एच. १४ बी.टी. ४३८६) मध्ये शेवगाव ते राहुरी प्रवासी बसवून निघाले होते. त्यानंतर राहुरी येथे येउन वांबोरी मुक्कामी करिता बसमध्ये प्रवासी बसवून सायंकाळी वांबोरी बस स्थानक येथे गेले. बस त्या ठिकाणी मुक्कामी असल्याने चालक व वाहक जेवण करून गाडीमध्ये झोपी गेले.
दि. ३० नोव्हेंबरच्या पहाटे ३ वा. चे सुमारास गाडीच्या डिझेल टाकीजवळ काहीतरी आवाज आल्याने चालक व वाहक यांनी गाडीच्या खाली उतरून पाहिले असता दोघेजण गाडीच्या डिझेल टाकीमधून पाईपने डिझेल काढताना दिसले. त्यावेळी एक भामटा अंधाराचा फायदा घेऊन स्कुटी गाडीवर पळून गेला. तेव्हा चालक व वाहक यांनी सचिन उर्फ बाळु राजेंद्र वाघमारे (रा.वांबोरी ता. राहुरी) याला पकडले. माहिती मिळताच वांबोरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक पालवे हे तेथे आले. त्यांनी भामट्याला ताब्यात घेऊन पळून गेलेल्या इसमाची चौकशी केली. त्याने त्याचे नाव संजय चंद्रकांत वेताळ असे असल्याचे सांगितले. बसचालक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून सचिन उर्फ बाळु राजेंद्र वाघमारे व संजय चंद्रकांत वेताळ यांचेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.