पाथर्डी – आनंदाचा शिधा घोटाळा प्रकरणात ज्या तरुणाचा समावेश आहे, त्या तरुणाच्या घरी काल रात्री पुरवठा शाखेतील काही कर्मचारी व रेशन दुकानदार गेले. त्यांनी या युवकाने घेतलेले पैसे तातडीने भरावेत, अशी मनधरणी केली, मात्र आजही या तरुणाने घेतलेले पैसे न भरल्याने आनंदाचा शिधा प्रकरणातील थकीत रकमेचा तिढा आज सुटू शकला नाही.
ज्या तरुणाने रेशन दुकानदारांचे पैसे घेऊनही भरले नाही, तो तरुण गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पुरवठा शाखेत कार्यरत असून रेशन दुकानदार, पुरवठा शाखा व महसूलचे अधिकारी मिळून जो व्हाॅट्सअप ग्रुप बनवण्यात आला होता, त्या ग्रुपमध्ये या तरुणाचा समावेश करण्यात आला होता.
या ग्रुपच्या माध्यमातून कोणत्या रेशन दुकानदाराला किती रेशनचा माल टाकला याची सविस्तर माहिती टाकणे, रेशन दुकानदाराचे वितरित होणाऱ्या धान्याचे परमिट लिखाणाचे काम करणे, शासनाच्या पोर्टेलचे लॉगिंग आय डी संचलित करणे, धान्य वितरण केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याची माहिती मशीन व संगणकामध्ये भरणे, रेशन दुकानदारांना कोणता माल कधी येणार आहे, किती माल शिल्लक आहे, या सूचना रेशन दुकानदारांना देणे अशी सर्व कामे हा तरुण करत होता.
हा तरुण पुरवठा शाखेत अधिकृतरीत्या नोकरीस नसतानाही शासकीय अधिकारी व रेशन दुकानदारांच्या व्हाॅट्सएप ग्रुपमध्ये त्याचा समावेश असल्याने अनेक रेशन दुकानदारांच्या मते तो अधिकृतरीत्या पुरवठा शाखेत नोकरीस होता, असा समज झाल्याने अनेकांनी त्याच्याकडे अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आनंदाच्या शिध्याची रक्कम दिली. या प्रकरणात मात्र पुरवठा विभागातील सावळागोंधळ चांगलाच चव्हाट्यावर आला असून आनंदाचा शिधा रेशन दुकानदारांना तीन टप्य्यात देण्यात आला.
पहिल्या टप्प्याचे पूर्ण पैसे आल्याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील शिधा रेशन दुकानदारांना देणे अपेक्षित नव्हते मात्र तरीही पहिली रक्कम आली की नाही याची खातरजमा न करताच सलग तीन टप्प्यात शिधा देण्यात आल्याने घोटाळा झालेल्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. आज नेमकी किती रक्कम रेशन दुकानदारांकडून घेणे बाकी आहे, याची माहिती घेण्यासाठी पुरवठा शाखेशी संपर्क केला असता तालुका पुरवठा अधिकारी व आर्थिक विभागाशी संबंधित अधिकारी नगर येथील पुरवठा विभागात बैठकीसाठी गेले असल्याचे सांगितले. आनंदाच्या शिध्याची नेमकी किती रक्कम रेशन दुकानदारांकडून घेऊन संबंधित तरुणाने कोषागारात भरली नाही, हे समजू शकले नाही.