पिंपरी, दि. ७ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थतीमुळे पिंपरी चिंचवड शहरातीत भोसरी फ याठिकाणी असणारे शिधापत्रिका कार्यालय वेळेआधीच बंद केले जात आहे. शिधापत्रिका कामासाठी रोजगार बुडवून आलेल्या नागरिकांची त्यामुळे चांगलीच गैरसोय होत आहे. या बाबत नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. कार्यालयाच्या या कारभारामुळे नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
नवीन आणि दुबार शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेत नाव कमी करणे किंवा वाढविणे आदींसह विविध कामे घेऊन शहरातील नागरिक कार्यालयात दाखल होतात. भोसरीतील परिमंडल अधिकारी नागनाथ भोसले अनेकदा कार्यालयात उपस्थित नसल्याचे चित्र असते. परिणामी नागरिकांचे काम अनेक महिन्यांपासून रखडले जात आहे. याठिकाणी अधिकारीच जागेवर नसल्याने तेथिल कर्मचारी काम घेऊन येणार्या नागिकांची कामे अडवून नागरिकांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच येथील कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून हे कार्यालय सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंतच मनमानी पद्धतीने चालू ठेवतात. दुपारी १ नंतर कार्यालयाला टाळा लावून बंद केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या सर्व प्रकरणाकडे फ विभागाचे परिमंडल अधिकारी नागनाथ भोसले यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसते. रोजगार बूडवून आलेल्या नागरिकांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विनाकारण हेलपाटा झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे परिमंडल अधिकारी नागनाथ भोसले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना कायम स्वरूपी कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे. या ठिकाणी नविन अधिकार्याची नियुक्ती करून नागरिकांचे रखडलेले काम मार्गी लावा, अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत.
या बाबत अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता आमचे कार्यालय बंद नसून सुरूच असते असे सांगण्यात आले. तक्रारदारांचा गैरसमज झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.