टी-२० विश्वचषकाचा पहिला सेमीफायनल सामना बुधवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड ( PAK vs NZ ) यांच्यात खेळला जात आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डॅरिल मिचेलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंड संघाने २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या. आता पाकिस्तानला विजय मिळवून फायनलमध्ये जाण्यासाठी १५३ धावांचे लक्ष्य मिळाले.
#IPL : आयपीएलचे सामने ठाण्यातही होतील; मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास
कर्णधार केन विल्यमसनने ४२ चेंडूत एका षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. तर डॅरिल मिचेलने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. शेवटी फलंदाजीस येऊन जेम्स नीशमने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने २ बळी घेतले, तर मोहम्मद नवाजला गडी बाद करण्यात यश आले.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान ( PAK vs NZ ) संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. दोन्ही देशांमध्ये आत्तापर्यंत २८ सामने झाले असून पाकिस्तानने१७ सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये झालेल्या ६ सामन्यांमध्ये पाकिस्तानने ४ तर किवी संघाने २ विजय मिळवले आहेत. त्यामुळे हेड-टु-हेड लढाईत पाकिस्तानी संघ वरचढ दिसत आहे.
बातमी लिहिली त्या वेळेपर्यंत ( PAK vs NZ ) पाकिस्तान संघ कोणताही गडी न गमावता ४ षटकांत ३२ धावांवर आहे. पाकिस्तानला आणखी विजयासाठी १२१ धावांची आवश्यकता आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सामन्यात चांगले खेळताना दिसत आहेत. दोघांच्याही बॅटवर चांगल्याप्रकारे चेंडू येताना दिसत आहे.