पुणे : केवळ दहा वर्षांचा असताना त्याला एका स्वयंसेवी संस्थेने मनोरुग्णालयात दाखल केले. आता तो तीस वर्षांचा झालाय. त्याला त्याचे आईवडिलही आठवत नाहीत. रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी हेच त्याच्यासाठी पालक व कुटुंब होते. मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांतून तो बरा झाला अन् तो या “पाशा’तून मुक्त झाला. त्यामुळे ‘फिटे अंधाराचे जाळे…. झाले मोकळे आकाश’ या पंक्ती त्याच्या आयुष्यात खऱ्या ठरल्या आहेत.
मनोरुग्णालयात असलेल्या; मात्र उपचारांतून बरे झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेत झाले “मोकळे आकाश’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात पाशा नावाच्या तरुणाचे पुनर्वसन करून करण्यात आली.
पाशाचे पालकत्व भोई प्रतिष्ठानने स्वीकारले आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सोनल पाटील यांच्याद्वारे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या वीस वर्षांपासून मनोरुग्णालयात दाखल असलेल्या पाशाला बाहेरच्या जगात येण्यापूर्वी भीतीने ग्रासले होते. त्यामुळे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने त्याच्या सामाजिक, मानसिक पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या आवाहनाला भोई प्रतिष्ठानने प्रतिसाद दिला व पाशाचे पालकत्व स्वीकारले. त्यामुळे त्याला बाहेरच्या जगात पाऊल ठेवता येणार आहे.
पाशाला निरोप देण्यासाठी सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर, राज्याच्या मानसिक आरोग्य आढावा बैठकीचे सदस्य मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजय भैलुमे, भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. हरिणाक्षी गोसावी, उपअधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, पाशाचे पालकत्व स्वीकारणारे भोई प्रतिष्ठानचे समन्वयक समीर सय्यद, जस्मिन सय्यद, मिलिंद उजागरे, स्नेहल सातोस्कर, विद्या सूर्यवंशी, सुधाकर गीते, धनश्री वाघ, संतोष परदेशी आणि डॉ. किरण चव्हाण उपस्थित होते. न्यायाधीश नांदेडकर, सचिव पाटील आणि डॉ. भोई यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
आज माझ्या नवीन आयुष्याची सुरवात आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे. आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल, असे मनोरुग्णालयातून मुक्त झालेला तरुण पाशा म्हणाला.