कामशेत – विघ्नहर्त्याच्या आगमनास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. कुंभारवाड्यात मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहेत तर शहरात ठिकठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यावर्षी शहरात महिनाभर आगोदरच स्टॉल्स लागल्यामुळे मूर्तीची निवड करण्यासाठी नागरिकांना मोठा अवधी मिळणार आहे. तर आतापासूनच गणेशमुर्तींचे बुकींग सुरू करण्यात आले आहे.
किमान महिनाभर आगोदरच भक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. महाराष्ट्रासह परदेशातही सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भक्तगण आतुरलेले असतात. मुर्तीची उंची, प्रतिष्ठापणा, गणेश आरती, पुजा आणि विसर्जन या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांना अनेक बंधने मागीलवर्षी पाळावी लागली होती; मात्र यावर्षी कुठली निर्बंध नसल्याने मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे
सध्या कुंभारवाड्यात तयार झालेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत. शहरात पेन, खपोली पुणे मुंबई येथील मूर्ती विक्रीसाठी येतात. काही ठरावीक स्टॉल्सवर पेणच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. या मूर्ती सुबक आणि आकर्षक असतात. त्यामुळे त्यांच्या किमतीही तशाच आहेत.
साधारणत: दीड फुटापासून ते तीन फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्ती स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. या मूर्तींची किंमत आकारानुसार 400 रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत आहेत. घरगुती मूर्तींमध्ये पाटावर, सिंहासनावर, हत्तीच्या सोंडेवर, मोरावर, पाळण्यात, नंदी बैलावर, पुस्तक वाचताना, स्वामी समर्थांच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात, पेशवाई, शंकर पार्वतींसमवेत, बाल रूपातील अशी नानाविध रूपातील मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. या मुर्तींना चांगली मागणी असल्याने विक्रेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.