व्यवसाय-नोकरी निमित्ताने मूळ गावापासून दूर गेलेल्या कुटुंबांना आपली कुलदेवता कणेरसर येथील येमाई देवी आहे, याची माहिती देवस्थानने जुन्या नोंदीवरून संकलित करून ती पत्राद्वारे त्या कुटुंबांना कळवण्यात आली. त्यांचे पत्ते शोधण्याचे काम अविरत करण्यात आले आणि ही कुटुंब पुन्हा त्यांच्या या कुलदेवतेशी जोडली गेली. अगदी झिम्बाब्वे देशात वास्तव्यास असलेले भारतीय नागरिकही या देवीचे कुलधर्म कुलाचार पार पाडण्यासाठी येतात, अशी ही पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर व शिरूर तालुक्याच्या सीमेवरील कन्हेरसर गावातील येमाई देवी आहे. देवस्थानने राबवलेला हा उपक्रम स्तुत्यच आहे.
यमाई देवीचे मंदिर पूर्वाभिमुखी असून, या मंदिराचा जीर्णोद्धार 1847-48 मध्ये झाला. मंदिराच्या दगडी बांधकामावर असलेले तोंडात एक, शेपटी मध्ये एक आणि चार पायांमधे असे हत्ती पकडलेल्या एका प्राण्याचे चित्र आहे. हे दगडी मंदिर सुस्थितीत आहे. कळसात कोरलेल्या तत्कालीन मूर्ती स्पष्ट दिसतात. या मंदिराच्या डाव्या बाजूला तत्कालीन आड (अरुंद रुंदीची विहीर) आहे. त्यातून एक प्रवेशद्वार दिसते. मात्र तो गुप्त भुयारी मार्ग आहे की इतर काही, याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. मंदिराच्या आवारात संतश्रेष्ठ कान्होराज, महादेव, गणेश, दत्त व महिषासुर मर्दिनी ही मंदिरे आहे.
यमाई मातेची मूर्ती शिळारूपी दगडाची आहे. ज्या ठिकाणी कान्होराज महाराजांची भेट झाली ती जागा ओढ्याची होती तसेच त्या ठिकाणी दफनभूमी असल्याने देवीचा तांदळा (शिळा) या ठिकाणी स्वयंभू उत्पन्न झाला. त्यावेळी एका प्रमुख गावकऱ्यांच्या स्वप्नात देवीने दर्शन देऊन आज जेथे मंदिर आहे त्या ठिकाणी माझे वास्तव्य राहील, असा दृष्टांत दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी हे मंदिर उभारले आणि त्या शिळेवर चांदी आणि पितळ धातूंचा मुखवटा चढविण्यात आला. देवीची मिरवणूक पालखीत हा मुखवटा ठेवून काढली जात असल्याची माहिती येथील देवीचे पुजारी संजय देशमुख यांनी दिली.
कन्हेरसरच्या यमाईबाबत एक आख्यायिका आहे. 1200 शतकातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन संत माता रेणुका देवीचे भक्त श्रीसंत कान्हूराज महाराज हे केंदूर (ता. शिरूर) येथील होते. यांना तपश्चर्येत समाधी अवस्थेत रेणुका देवीने दर्शन दिले, त्यावेळी माते तुझे सतत दर्शन व्हावे ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. देवीने तथास्तु म्हणत, मी दिव्य रूपाने दर्शन देईल प्रकट होणार नाही ही अट घातली आणि तू इच्छित स्थळी निःशंक मार्गक्रमण कर. मात्र तुझ्या मागे मी येत आहे ही खात्री ठेव अन्यथा जिथे तू मागे वळून पाहशील तिथेच माझे वास्तव्य राहील, असे देवीने वचन दिले.
कान्होराज महाराज केंदुरकडे मार्गक्रमण करीत असताना देवीच्या पावलांचा आवाज आला नाही म्हणून त्यांनी मागे बघितले त्याच क्षणी देवी अंतर्धान पावली ते स्थळ म्हणजे तत्कालीन ओढ्याकाठी असलेले घनदाट कन्हेरीचे बन (वन) म्हणजेच आजचे कन्हेरसर. त्यानंतर भानावर आलेल्या महाराजांनी देवीचा, माझ्या पाठी पुन्हा ये माई, ये माई असा धावा केला, देवी पुन्हा प्रकट झाली. मात्र, मी येथेच निरंतन वास करेन, तूही येथेच भक्ती कर असे सुचवले. त्या काळापासून महाराजांनी जिथे भक्तीचा मळा फुलवला ते स्थान कन्हेरसर येथील येमाई मंदिर म्हणून उदयास आले असून, हे जागृत स्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
कसे जायचे…
मंदिर पुण्यापासून उत्तरेला 60 कि. मी. वर आहे. राजगुरुनगर येथे येऊन पूर्वेला शिरूर मार्गावर 15 कि. मी. वर हे मंदिर आहे.
मंदिरावर शासननियुक्त अधिकारी
येमाई देवस्थान ट्रस्टची व्यवस्था शासननियुक्त प्रशासकीय अधिकारी पाहत आहे. दरम्यान मागील यमाई देवी देवस्थान ट्रस्टकडून सर्व भाविकांसाठी दर्शनबारी व कुलधर्म कुलाचार आणि इतर धार्मिक सोपस्कार पार पाहता यावे यासाठी निवासी व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, शौचालये, हिरवळयुक्त बाग निर्माण करण्यात आली आहे. भाविकांना पूजासामग्री उपलब्ध व्हावी यासाठी व्यवसायिक गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राजेंद्र वारघडे, रामचंद्र सोनवणे