मुंबई – ओम राऊत यांचा आदिपुरुष हा चित्रपट सतत वादात सापडत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याने खळबळ उडाली होती. टीजर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी यातील पात्रांवर आक्षेप घेत ट्रोलिंग केले होते.आता या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमुळे निर्मात्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आदिपुरुषच्या नव्या पोस्टरवरून आता तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे समजते.
रामनवमीच्या मुहूर्तावर आदिपुरुषाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी निर्माते काहीतरी चांगले घेऊन येतील अशी आशा प्रेक्षकांना होती, पण पुन्हा एकदा लोकांची निराशा झाली.पोस्टरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता आणि आता आदिपुरुषच्या निर्मात्यांविरोधात पोलिस तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
संजय दीनानाथ तिवारी नावाच्या व्यक्तीने प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर आदिपुरुष या चित्रपटाचे निर्माता, कलाकार आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. स्वत:ला सनातन धर्माचा प्रचारक म्हणवून घेणारे संजय तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयातील वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत तक्रार दाखल केल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे.
आदिपुरुषच्या नवीन पोस्टरमध्ये हिंदू धर्मग्रंथ रामचरितमानसमधील पात्रे अयोग्य पद्धतीने दाखवण्यात आली असून दिग्दर्शक ओम राऊत यांनी हिंदू धर्म समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 295(A), 298, 500, 34 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोस्टरमध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम ज्या ड्रेसमध्ये दाखवले आहेत ते रामचरित मानसपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत असं तक्रार कर्त्यांचं म्हणणं आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषमध्ये प्रभास आणि क्रिती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.