दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या अंकिताताई भुजबळ यांचा विवाह तळेगाव ढमढेरे येथील सामाजिक कार्यकर्ते भरत भुजबळ यांच्याशी 2014 मध्ये झाला. लग्नाच्या आधी माहेरी कुटुंबात कोणीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती; परंतु पती भरत भुजबळ हे पहिल्यापासून गावातील सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी होत असल्याने त्यांच्यामुळे हळूहळू सामाजिक कार्याची गोडी निर्माण झाली. पतीच्या खांद्याला खांदा लावून परिसरातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कमरेला पदर खोचून उभ्या राहिल्या. महिला बचत गट उभे केले. त्यांच्यामार्फत महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय उभे करण्यासाठी अल्प व्याजदरात कर्ज दिले. 2021 साली तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत निवडणूक लढविली. पाठीशी कुठलाही अनुभव गाठीशी नसताना आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला सामोरे जात असताना ग्रामस्थांनी भरभरून मतांनी विजयी केले. त्यात सरपंच आरक्षण इतर मागासवर्गीय महिला राखीव असे जाहीर झाले. तळेगाव ढमढेरेच्या प्रथम नागरिक सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. पती भरत भुजबळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने त्यांचे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात लाभत आहे.
शिरूर तालुक्यातील सर्वांत मोठे लोकसंख्येचे गाव म्हणून तळेगाव ढमढेरेची ओळख तसेच गावात सर्वच राजकीय पक्षाचे मुख्य पदाधिकारी व तालुक्यातील उच्चपदावर काम केलेली मंडळीदेखील असल्याने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन गावगाडा चालविला आहे. हे आव्हान होते, पण गावातील लोकांची साथ व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे पाठबळ यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून अनेक विकासकामे, शासकीय योजना, लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरले. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावातील वाडी-वस्तीवर शुद्ध पाण्याची व्यवस्था होणार आहे. त्यासाठी शासनाकडून सुमारे 13.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
योजनेचे काम जलदगतीने सुरू आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात गावच्या वापराच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने गावात सार्वजनिक ठिकाणी बोअरवेल घेऊन पाण्याची व्यवस्था केली. गावच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या गटार लाइनची कामे 15 वा वित्त आयोग, जिल्हा परिषदेमार्फत निधी मिळवून मार्गी लावला. वाडी वस्ती, गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण केले. यासाठी जिल्हा परिषद, आमदार निधी, 15 वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समितीमार्फत पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणून गावातील रस्ते खड्डामुक्त रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले.
महिला व बालकल्याण निधी अंतर्गत तळेगाव ढमढेरे गावातील 20 अंगणवाडी शाळांना वजनकाटे उपलब्ध करून देण्यात आले आहे. 17 जिल्हा परिषद शाळा ई लर्निंग करण्यासाठी ई लर्निंगचा संपूर्ण सेट उपलब्ध केला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वॉटर फिल्टर भेट देण्यात आली आहेत. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाज मंदिर बांधणे, बंदिस्त गटार लाइन, अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापन, परिसर सुधारणा करणे यासाठी विविध विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावामध्ये सार्वजनिक शौचालय, जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय युनिट उभे करण्यासाठी ग्रामपंचायत निधी व जिल्हा परिषद निधी उपलब्ध करून दिला.
कोविडसारख्या महामारीवेळी देशात लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. अशावेळी तळेगाव ढमढेरे परिसरातील जॉन डीअर कंपनीच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे नागरिकांसाठी दोन हजार लसी उपलब्ध करून देण्यात यश आले. करोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक व आशासेविकांची मोलाची साथ लाभली. या पुढील काळात ग्रामस्थांच्या सहाय्याने गावाला भेडसावणारा मुख्य प्रश्न कचरा व्यवस्थापनाचा आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्ज प्रकल्प उभा करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत.
त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणार आहे. गावातील नवयुवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा तसेच युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी तळेगाव ढमढेरेमध्ये भव्यदिव्य व्यापारी संकुल उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावाला अर्धी काशी म्हणून ओळख असून गावात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. याच अनुषंगाने गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.
संकलन : मयूर भुजबळ, तळेगाव ढमढेरे.