पुणे –पिंपरी-चिंचवड महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पदाधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा धसका पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह इतरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. यावेळी ऍन्टिकरप्शन विभागाला स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयात काही रोकड असलेली पाकिटे देखील सापडली. स्थायी समितीच्या अन्य सदस्यांना ही रक्कम वाटप करण्यात येणार असल्याचा संशय आहे. त्यामुळे आणखी काही पदाधिकारी ऍन्टिकरप्शनच्या फेऱ्यात सापडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
स्थायी समितीमध्ये खाबुगिरी काही नवीन नाही. परंतु, यापूर्वी ठेकेदार तक्रार करत नसल्याने कारवाई होत नव्हती. यापूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अनेकवेळा कारवाई करण्यात आली. परंतु पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाईची ही पहिलीच घटना आहे. पिंपरीतील कारवाईमुळे पुणे महापालिकेत देखील अशाच प्रकारची कारवाई होऊ शकते, या भीतीने काही पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच अशा कारवाईत अडकल्यास मतदारांसमोर प्रतिमा मलीन होईल, अशी भीती पदाधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळे पदाधिकारी ताकही फुंकून पितील अशी चर्चा रंगली आहे.