पुणे – पारंपारिक वाद्यांच्या गजरात भक्तीमय वातावरणात वरूणराजाच्या उपस्थितीत पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे आज गुरुवारी (दि. 28 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन झाले. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
पुणे शहरात गेली दहा दिवस भक्तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज निरोप दिला जात आहे. सकाळी 10 वाजतापासून शहरात विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन शहरात सुरु आहे. सर्व मंडळे आणि महापालिका प्रशासन तसेच पोलिसांनी या मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. सर्वत्र भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन 4 वाजून 35 मिनिटांनी झाले. त्यानंतर आता मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचे थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. दरम्यान, आज गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. भर पावसात गणेश भक्तांचा उत्साह दिसून येत होता.
मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती –
पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला 1400 वर्षांचा इतिहास आहे. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते. 1893 साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते.