मुंबई – दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. परंतु आज पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाही. तसेच चौकशीला हजर राहणार नसल्यामुळे वकिलांनी चौकशीसाठी पुढील तारीख मागितली आहे.
साई रिसॉर्ट प्रकरणी परब यांच्यावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई रिसॉर्टचा मालकी हक्क आणि रिसॉर्ट बांधण्यामध्ये गैरव्यवहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दापोलीतील स्थानिक ग्रामपंचायतींकडून ईडीने महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. या आधारे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने अनिल परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये अनिल परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती.