– हिमांशू
गुप्तधनाच्या लालसेपायी लोक मांडूळ आणि खवल्या मांजरासारख्या प्राण्यांची तस्करी करतात. गुप्तधन शोधून देण्याचा दावा करणाऱ्या टोळ्याही ठिकठिकाणी सक्रिय असतात आणि गुप्तधन सापडण्यापूर्वीच भरभक्कम मानधन घेऊन त्या पोबारा करतात. गुप्तधनासाठी अनेकजण तांत्रिक-मांत्रिकांचं उखळ पांढरं करतात आणि स्वतः मात्र टाचा घासून मरतात. गुप्तधनासाठी नरबळी दिल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्यात. झटपट श्रीमंत होण्यासाठी काहीजण आयुष्यभर गुप्तधनाची आशा बाळगतात; पण हाती काहीच लागत नाही. ढिसाळ व्यवस्थेचा फायदा घेऊन झटपट श्रीमंत होणारे मात्र गुप्तधन लपवून ठेवतात.
गुप्तधन लपवणारे आणि शोधणारे हे दोघेही अर्थव्यवस्थेसाठी घातकच; पण लपवणारे अधिक घातक. कारण, गुप्तधन शोधणारे कुठेतरी खोदकाम करून मेहनत वाया घालवतात; पण लपवणारे इतरांची मेहनतीची कमाई हडप करतात. यामुळे निर्माण होणारी दरी किती त्रासदायक असते, याचं उदाहरण पाकिस्तानमध्ये सध्या पाहायला मिळतंय. तिथं पेट्रोल नुकतंच 26 रुपयांनी महागलं. महागाईचा 58 वर्षांचा विक्रम एप्रिल महिन्यातच मोडला होता. 2022 ते 2023 या एकाच वर्षात पाकिस्तानातली महागाई 40 टक्क्यांनी वाढली.
तूप वगैरे खाण्याचं स्वप्नही पाकिस्तानात बहुतांश लोक पाहू शकत नाहीत. इंधनाच्या ताज्या दरवाढीमुळे महागाई किती वाढेल, याचा अंदाज घेऊनच लोक घाबरलेत. एकीकडे ही परिस्थिती असताना रावळपिंडीत मात्र नोटांचे डोंगर सापडलेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अब्जावधी रुपयांचं देशी-विदेशी चलन एका तळघरात लपवलेलं फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला दिसून आलंय. याखेरीज 13 डिजिटल लॉकर या तळघरात आढळलेत आणि ते उघडण्याचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत.
या लॉकर्समध्ये परदेशी चलन असावं, असा संशय आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्तानात मनी लॉंड्रिंगच्या विरोधातील कारवाई गतिमान झालीय. रविवारी सकाळी रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका प्लाझाच्या तळघरात छापा मारला असता, तिथं काहीच मिळालं नाही. परंतु अधिकाऱ्यांना एका भिंतीच्या रचनेबद्दल संशय आला आणि ती फोडल्यावर काही खोक्यांमध्ये लपवलेलं हे प्रचंड घबाड सापडलं. डिजिटल लॉकर कुणाचे आहेत, हे अद्याप समजलेलं नाही; पण त्यात नेमकी किती संपत्ती असेल, याचा अंदाजच हादरवून टाकणारा आहे.
खोक्यांमधून जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये 40 कोटी पाकिस्तानी रुपयांचा समावेश आहे; पण माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, परकीय चलन जमेस धरलं तर अब्जावधींची माया या तळघरात सापडली. तळघर सील करून आठ जणांना अटक झालेली असली, तरी त्यांच्याविषयी अधिकृत माहिती दिली गेली नाही. सापडलेल्या गुप्तधनाचा तपशील बाहेर येईल की नाही, सांगता येत नाही. पण बेसुमार महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचं जगणं अवघड झालेलं असताना काहीजणांकडे नोटांच्या राशी सापडणं बरंच काही सांगून जातं.