– हिमांशू
एका लोकप्रिय मराठी चित्रपटातील विनोदी पात्राला ‘चोरीचा आजार’ झाल्याचं दाखवलंय. दिसेल ती वस्तू आपलीच आहे अशा थाटात उचलून तो निघून जातो. ही दृश्यं बघून हसायला येतं आणि हसून आपण ते सोडूनही देतो. पण खरोखर असा ‘चोरीचा आजार’ असतो का? हा प्रश्न आपल्याला पडत नाही आणि पडला तरी आपण तोही हसून सोडून देतो. ‘क्लेप्टोमेनिया’ असं या आजाराचं नाव असल्याचं चित्रपटात दाखवलंय, तेही आपल्याला कपोलकल्पित वाटतं. पण खरोखर असा आजार अस्तित्वात असावा का, यावर विचार करण्याजोगा प्रसंग नुकताच घडलाय. मॉलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात एक महिला दिसते. तिच्या खांद्यावर ब्रँडेड हँडबॅग आहे. कपड्यांच्या विभागात ङ्गिरता-ङ्गिरता ती इकडेतिकडे पाहते.
कुणी पाहात नाही, याची खात्री करून काही कपडे हँडबॅगमध्ये टाकते आणि निघून जाते. ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून, न्यूझीलंडमधील ग्रीन पार्टीच्या खासदार गोलरीझ घरमन आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही ङ्गूटेज तपासल्यानंतर ही घटना खरी असल्याचं सांगितलं. ‘शॉपलिफ्टिंग’चा हा गंभीर प्रकार सर्वांना ठाऊक झाल्यावर खासदार मॅडमनी राजीनामा देणं ओघाने आलंच! आपल्या वर्तनामुळे आपल्या लोकांची निराशा झालेली असल्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असं त्यांनी सांगितलं. वास्तविक खासदार मॅडमनी केलेली ही पहिलीच चोरी नाही. पूर्वीही दोनदा अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये त्यांची ‘हाथ की सङ्गाई’ दिसून आली आहे.
खासदार मॅडमना म्हणे ‘चोरीचा आजार’ आहे. त्या स्वतः झाल्या प्रकाराबद्दल खजील असल्या तरी प्रचंड तणावामुळे आपल्या हातून हे घडलं, अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे. खरं तर गोलरीझ या इतिहास घडवणार्या खासदार आहेत. न्यूझीलंडमधल्या त्या पहिल्या निर्वासित खासदार. त्या लहान असताना त्यांचे कुटुंबीय इराणहून न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाले होते. खासदार म्हणून निवड झाल्यावर त्यांच्याकडे न्याय विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. अशा कर्तबगार महिलेने ‘शॉपलिफ्टिंग’ का करावं? त्या स्वतः असं सांगतात, की कामाच्या तणावामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, त्यातूनच हे घडलंय. आपल्या मानसोपचार तज्ज्ञांचा हवालाही त्या देतात.
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यात कमी पडल्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असंही त्या म्हणतात. हातून चूक घडल्यानंतर, आपल्याला निवडून देणार्या लोकांच्या भावना दुखावल्याची गोलरीझ यांना झालेली जाणीव, मानसिकदृष्ट्या संतुलित असणार्या अनेकांना मार्गदर्शक आहे. परंतु अतिताणामुळे चोर्या करण्याचा आजार जडू शकतो, हा त्यांचा खुलासा मानसिक श्रम करणार्यांसाठी, तणावाखाली काम, दगदग, धावपळ करणार्यांसाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे.
‘शॉपलिफ्टिंग’च्या आजाराचं विश्लेषण दोन प्रकारे केलं जातं. काही तज्ज्ञांच्या मते हा अगदी सामान्य प्रकार आहे, तर काहींच्या मते चिंता आणि मानसिक आघातामुळे जडणारा हा गंभीर आजार आहे. चिंतेचं सावट असताना ते कमी करण्यासाठी काहीजण दारू पितात, तसंच हे आहे. अर्थात, अल्कोहोलमुळे चिंता, ताणतणाव कमी होण्याऐवजी असलेले प्रॉब्लेम वाढतात, त्याचप्रमाणे चोरी करताना पकडल्यास मनोविकाराचा ‘अँगल’ कुणीच समजून घेणार नाही. असे प्रकार घडतही असतील; गोलरीझ यांच्यामुळे ही बाजू उघडपणे दिसली एवढंच!