हिमांशू
भस्मासुराची गोष्ट असंख्य वेळा सांगितली गेली, ऐकली गेली आणि वारंवार प्रत्यक्षात घडलीसुद्धा! खरं तर “पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या न्यायाने या गोष्टीची पुनरावृत्ती एकदाही होणं अपेक्षित नव्हतं. परंतु ठेच लागल्यावर सुधारेल तो माणूस कसला! तसं असतं तर “लांडगा आला रे आला’ गोष्टीचीही पुनरावृत्ती झाली नसती. परंतु अशा सर्वच कहाण्या जगाला पुनःपुन्हा पाहाव्या लागल्या. इतिहासाची पुनरावृत्ती होते तशीच चुकांचीही पुनरावृत्ती होत राहिली आणि गोष्टी घडत राहिल्या. “भस्मासुरा’चं ताजं उदाहरण पाहायचं झाल्यास इस्रायलकडे पाहावं लागेल. याच देशातल्या एका कंपनीनं तयार केलेलं “पेगॅसस’ हे स्पायवेअर जगभरात सध्या चर्चेत आहे. भारतात या स्पायवेअरचा वापर झाला की नाही? ते विकत घेतलं गेलं की नाही? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असल्यास कुणाकुणावर नजर ठेवली गेली? या प्रश्नांवरून सध्या रणकंदन माजलंय.
मध्यंतरी थंड पडलेलं हे प्रकरण अमेरिकेतल्या “न्यूयॉर्क टाइम्स’ वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनंतर पुन्हा गरम झालं. हे सॉफ्टवेअर भारताने इस्रायलकडून खरेदी केलं होतं, असा दावा या बातमीत करण्यात आला होता. “न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीनुसार, इस्रायलबरोबर झालेल्या शस्त्रास्त्र खरेदी कराराचा “पेगॅसस’ हा एक भाग होता. सुमारे चाळीस पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आली, असा दावा भारतातल्या काही माध्यमांनी पूर्वी केला होता, तो पुन्हा ऐरणीवर आला.
लेटेस्ट बातमी अशी आहे की, “पेगॅसस’ स्पायवेअरचा वापर करून इस्रायलमधल्याच पोलिसांनी हेरगिरी केल्याचा आरोप झालाय. इथेच भस्मासुराची गोष्ट सुरू होते. भारतीय माध्यमांपासून “न्यूयॉर्क टाइम्स’पर्यंत आलेल्या बातम्या केवळ “संशय’ किंवा “चर्चा’ या सदरात बसू शकतात; पण “पेगॅससची गंगोत्री’ असणाऱ्या इस्रायलमध्येच तशी बातमी छापून आल्यावर करणार काय? आपल्याकडे सध्या तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव याबाबत माहिती दिली गेलेली नाही. परंतु शत्रुराष्ट्रे आणि दहशतवादी यांच्या हालचालींचा अंदाज घेण्यासाठी उत्पादित केलेलं हे सॉफ्टवेअर लोकांची हेरगिरी करण्यासाठी वापरलं गेलं की नाही, हा प्रश्न विस्मृतीत जाता-जाता दोन वेळा नव्यानं समोर आला. बाकी कोणतीही माहिती मिळालेली नसली तरी काही गोष्टी स्पष्ट आहेत. असं स्पायवेअर आता उपलब्ध आहे, जे कुणाच्याही मोबाइलमध्ये सोडता येतं आणि त्याच्या माध्यमातून हेरगिरी करता येते.
हे स्पायवेअर फक्त सरकारांनाच विकलं जातं आणि व्यक्तिगत पातळीवर त्याचा सौदा केला जात नाही, असं “पेगॅसस’ बनवणाऱ्या कंपनीनं सांगितलंय; परंतु लोकनियुक्त सरकारवर लोकांचा ठाम विश्वास असतो आणि नेमक्या त्याच ठिकाणी अनिश्चितता निर्माण करण्याचं काम या स्पायवेअरनं आणि त्याच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनी केलंय. आता खुद्द इस्रायलमध्येच हे संशयाचं भूत भटकतंय. होय, भूतच! तंत्रज्ञान हे नीट वापरलं तर सूत आहे नाहीतर भूतच आहे, याचा हा आणखी एक नमुना. कुणाच्याही डोक्यावर केवळ हात ठेवून भस्म करण्याची शक्ती हे पुराणातल्या भस्मासुराला प्राप्त झालेलं वरदानच होतं; पण त्यानं त्याचा दुरुपयोग केल्यामुळे तो जगासाठी शाप ठरला. आजमितीस केवळ स्पायवेअरच नव्हे तर बऱ्याच प्रकारचं तंत्रज्ञान वरदान म्हणता-म्हणता शाप ठरू लागलंय. तंत्रज्ञान उत्तमच आहे; पण मनात लपलेल्या भस्मासुराचं काय?