यशवंतनगर – नडशी कॉलनी, ता. कराड येथे शिरवडे स्टेशन रस्त्यालगत बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास दुचाकीवरुन आलेला एक जण एक बॅग ठेवून कराडच्या दिशेने निघून गेला. ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीती पसरली होती. मात्र, या बॅगमध्ये किरकोळ साहित्य सापडल्याने पोलीस आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
काही सजग नागरिकांनी याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरोटे यांनी पोलीस कर्मचारी डी. आर. काळे, नीलेश विभूते, संदेश दीक्षित, पोलीस पाटील वैशाली गायकवाड यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी संशयास्पद बॅग उघडली असता, जेवणाचा डबा, मोजणी टेप असे साहित्य बॅगेत सापडले.